नवी दिल्ली - 'हक्कानी नेटवर्क' दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदनं या वृत्तास दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलालुद्दीन हक्कानीचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह अफगाणिस्तानमध्ये दफन करण्यात आला आहे. मुजाहिदनं सांगितले की, 'मुल्ला उमरच्या मृत्यूनंतर तालिबानसोबत एकत्ररित्या राहण्यामागे हक्कानी नेटवर्कनं महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. हक्कानीची अल कायदाच्या नेत्यांसोबत खूप जवळीक होती आणि अफगाणिस्तान-पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे समर्थन करण्यातही महत्त्वाची भूमिका होती.
जलालुद्दीन हक्कानीचा जन्म 1939 मध्ये अफगाणमधील पकतिया प्रांतामध्ये झाला होता. 2012 साली अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी हक्कानी नेटवर्कला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. हक्कानी नेटवर्कला पूर्वी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएनं समर्थन दर्शवले होते. सोव्हिएत संघाविरोधात अमेरिकेने हक्कानी नेटवर्कला मदत केली होती. मात्र, यानंतर हाच हीच संघटना पाश्चिमात्य देशांविरोधातही उभी राहिली. दरम्यान, गेल्या 10 वर्षांपासून जलालुद्दीन हक्कानी आजारी होता. दीर्घ आजाराने सोमवारी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मुजाहिदनं दिली.