बांगलादेशातील एका दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मोठ्या जहाजाच्या खाली आल्यानं एक लहान नौका बुडाली आहे. हा संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर १०० हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
राजधानी ढाक्याजवळ असलेल्या शीतालक्ष्या नदीत एमव्ही रुपोशी-९ नं या मालवाहू जहाजानं एमव्ही अफसरुद्दीनला धडक दिली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मोठं जहाज लहान नौकेला काही मीटरपर्यंत खेचत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर नौका उलटते आणि ती पाण्यात बुडते. काही जणांनी नौका बुडण्यापूर्वी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या.
थोड्याच वेळात मालवाहू जहाज थांबतं. मात्र तोपर्यंत नौका पूर्णपणे बुडालेली असते. जवळच असलेल्या एका जहाजातील एकानं हा व्हिडीओ चित्रीत केला. मालवाहू जहाज नौकेला धडक देत असताना नौकेतील अनेक जण किंचाळत होते. घटनेचा व्हिडीओ रेडइटसोबत अनेक ठिकाणी व्हायरल झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ रेडइटवर २५ हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. काहींना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.