नोट्रे डेम : प्लास्टिक आपल्या कपडे, कार, मोबाइल फोन, पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांमध्ये असते. परंतु अलीकडील संशोधनाने काळजी वाढविली असून आपल्या चक्क मेंदूपर्यंत प्लास्टिक पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र मानवी मेंदूपर्यंत पोहोचलेले हे मायक्रोप्लास्टिक खरेच धोकादायक आहे का, आपण काय काळजी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. सामान्यत: मायक्रोप्लास्टिक पाच मिलिमीटरपेक्षा लहान असतात. त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. यामुळे मानवी आरोग्यासाठी गंभीर चिंता निर्माण झाली असून, याचा शरीरावर किती गंभीर परिणाम होत आहे यावर संशोधन वाढत आहे.
मायक्रोप्लास्टिक्स मेंदूमध्ये कसे गेलेय?- मायक्रोप्लास्टिक्स सहसा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करते. आपण हवेतील मायक्रोप्लास्टिक्सचा श्वास घेत आहोत. - एकदा हे कण आतडे किंवा फुफ्फुसात गेले की ते रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात आणि नंतर शरीरातील वेगवेगळ्या अवयवांमध्ये प्रवास करू शकतात. - अभ्यासात मानवी विष्ठा, सांधे, यकृत, प्रजनन अवयव, रक्त, रक्तवाहिन्या आणि हृदयामध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहे.
नवीन अभ्यासात काय? ऑस्ट्रेलियातील कार्टिन विद्यापीठ तसेच नोट्रे डेम विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले. अभ्यासात यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूचे नमुने घेण्यात आले होते. मेंदूच्या नमुन्यांमध्ये यकृत आणि किडनीच्या नमुन्यांपेक्षा ३० पट जास्त मायक्रोप्लास्टिक असल्याचे पाहून संशोधकांना धक्काच बसला. मेंदूला जास्त रक्तप्रवाह (प्लास्टिकचे कण सोबत घेऊन जाणे) यामुळे हे होत असावे असा त्यांचा अंदाज आहे. सापडलेले मायक्रोप्लास्टिक बहुतेक पॉलिथिलीनचे होते. हे बाटलीचे टोपण आणि प्लास्टिकच्या पिशव्या यांसारख्या अनेक दैनंदिन उत्पादनांसाठी वापरले जाते.
चिंता करावी का? - काही प्रयोगशाळेतील प्रयोगानुसार मायक्रोप्लास्टिक मेंदूमध्ये सूज आणि पेशींचे नुकसान करतात. परंतु मायक्रोप्लास्टिक आणित्यांचे परिणाम अभ्यासणे सध्या कठीण आहे. - जोपर्यंत आपल्याकडे अधिक वैज्ञानिक पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत आपण सर्वांत चांगली गोष्ट करू शकतो ती म्हणजे प्लास्टिकचा आणि आपला संपर्क कमी करणे, प्लास्टिकचा कचरा कमी करणे. - सुरुवात करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे प्लास्टिकमध्ये पॅक केलेले किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पुन्हा गरम केलेले खाद्यपदार्थ आणि पेये टाळणे.
२०१६ ते २०२४ दरम्यान मेंदूच्या नमुन्यांमधील प्लास्टिकचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले असून, यामुळे प्लास्टिक प्रदूषण आणि मानवी संपर्क किती वाढला आहे हे यातून दिसून येते.