नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचं मोठं संकट असून सरकारी यंत्रणा या लढाईत सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, हाताबाहेर चाललेली परिस्थिती आणि अपुरी पडणारी यंत्रणा पाहून लोकांचा राग अनावर होत आहे. त्यामुळे, सोशल मीडियावरुन सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. तसेच, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात येत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर #ResignModi हा हॅशटॅग चालविण्यात येत होता. मात्र, 28 एप्रिल रोजी फेसबुकने हा हॅशटॅग काही काळासाठी ब्लॉक केला.
फेसबुकने हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडियावर 12000 पेक्षा जास्त पोस्ट दिसणे बंद झाले होते. या पोस्टमध्ये कोरोना महामारीच्या काळात सरकारच्या अपयशाबद्दल टीका करण्यात आली होती. त्यानंतर, काही युजर्संने फेसबुकच्या या हॅशटॅग ब्लॉकच्या घटनेची ट्विटरवरुन तक्रार केली. त्यावेळी, हॅशटॅग #ResignModi हा कंटेट आमच्या फेसबुक कम्युनिटी स्टँडर्सच्या विरुद्ध आहे, असा मेसेज युजर्संना दिसत होता. दरम्यान, याप्रकरणी फेसबुककडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
लोकशाहीमध्ये असं चालतं का? असा सवाल ट्विटर युजर्सं शिवम शंकर सिंह यांनी विचारला आहे.
खासदार महुओ मोईत्रा यांनीही विचारला होता सवाल
देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे. ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर होत आहे. त्यातच, ट्विटवरुन सर्वाधिकपणे टीका केली जात आहे. त्यामुळे सरकारविरोधातील काही जणांचे ट्विट्स काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत. सरकारच्या या आदेशानंतर अनेकांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. सत्य कसं डिलीट होऊ शकतं, असे मोईत्रा यांनी म्हटलंय.