Lebanon Explosions, Hasan Nasrallah Hezbollah vs Israel: लेबनानमधील पेजर आणि रेडिओ हल्ल्यानंतर हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह याने इस्रायलला कडक शब्दांत इशारा दिला आहे. नसराल्लाह म्हणाला की, इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला. हा प्रकार युद्धाच्या घोषणेसारखाच आहे. इस्रायलने ज्या प्रकारे हल्ले केले, त्यात सामान्य नागरिकांना लक्ष्य केले गेले. हा हल्ला करून इस्रायलने मर्यादा ओलांडली आहे. गेल्या दोन दिवसांत ज्याप्रकारे हल्ले झाले, त्याची शिक्षा निश्चितच दिली जाईल.
हिज्बुल्लांसह सामान्य नागरिकांवरही हल्ले
हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहने सांगितले की, इस्रायलने पेजरला लक्ष्य करून हल्ला केला. लेबनानमध्ये ४ हजारांहून अधिक पेजर्स वापरले जात असल्याची माहिती त्यांना होती. इस्त्रायलने हल्ले करून केवळ हिजबुल्लाच्या सैनिकांनाच लक्ष्य केले नाही तर एकाच वेळी लेबनानमधील ४ हजार लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटल, मार्केट, घरे, खासगी संस्थांनाही लक्ष्य केले गेले. त्यामुळे याचा फटका हजारो महिला व बालकांनाही बसला.
हिज्बुल्लाचा इस्रायलला इशारा
हिज्बुल्ला गाझाला पाठिंबा देणे थांबवणार नाही. परिणाम आणि शक्यता विचारात न घेता लेबनान गाझाला पाठिंबा देत राहील. इस्रायल त्यांना हवं ते करू शकतात, परंतु आता हिज्बुल्लाह उत्तर इस्रायलमधील विस्थापित लोकांना त्यांच्या घरी परत येऊ देणार नाहीत, असा इशारा हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहने दिला.
आम्ही गुडघे टेकणार नाही!
हिजबुल्लाच्या प्रमुखाने जाहीर केले की अशा हल्ल्यांमुळे हिजबुल्ला गुडघे टेकणार नाही. अमेरिका आणि इतर महासत्ता त्यांच्या पाठीशी असल्यामुळे इस्रायलला तंत्रज्ञानाची मदत मिळत आहे. हल्ल्यांच्या आव्हानाचा सामना केल्यानंतर हिजबुल्ला पुन्हा संघर्ष करेल, असा दावा नसराल्लाहने केला. तसेच, हिजबुल्लाला कितीही मोठा फटका बसला तरी आमची उमेद मोडता येणार नाही, असेही नसराल्लाहने आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले.