ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 20 - इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांना दुस-यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन कोटी 50 लाख मतांची मोजणी पूर्ण झाली असून, रुहानी यांना निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एक कोटी 40 लाखापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाचे प्रमुख अली असगर अहमद यांनी सरकारी वाहिनीवर मतमोजणीचे हे आकडे जाहीर केले.
रुहानी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी यांना एक कोटीच्या आसपास मते मिळाली आहेत. मोस्तफा मीरसाली आणि मोस्तफा हासीमीताबा हे दोघे सुद्धा शर्यतीत आहेत पण त्यांना फक्त काही टक्के मते मिळतील. इराणच्या भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. इराणमध्ये शुक्रवारी जवळपास 4 कोटी नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावला. इराणमध्ये मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
चारवर्षांपूर्वी इराणची सत्ता मिळवताना रुहानी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराणचा विजनवास संपवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी कामही केले. इराणचे दरवाजे जगासाठी खुले केले. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. ही निवडणूक म्हणजे मतपेटीतून फक्त जनतेचा कौल नसून, रुहानी यांनी जी धोरणे राबवली त्यावर जनतेने दिलेला निकाल आहे. 2015 मध्ये रुहानी यांनी जागतिक महासत्तांबरोबर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम मर्यादा आणण्याचा करार करुन जागतिक निर्बंधातून सवलत मिळवली.