चेन्नई /कोलंबो : भारतात राजकीय वादळ उठताच श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरील तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांंची खिल्ली उडविणारा वादग्रस्त लेख काढण्यात आला असून या प्रकरणी श्रीलंकेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री जयललिता यांची बिनशर्त माफी मागून उभय देशांदरम्यानच्या संबंधात वितुष्ट निर्माण करणारे वादळ शमविण्याचा प्रयत्न केला.‘हाऊ मिनिंगफूल आर लव्ह लेटर्स टू नरेंद्र मोदी’ असे शीर्षक असलेल्या या वादग्रस्त लेखावरून भारतात विशेषत: तामिळनाडूत संतापाची तीव्र लाट उसळली. या लेखासोबत नरेंद्र मोदी आणि जयललिता यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्रही टाकण्यात आले होते. भाजपा, पीएमके व एमडीएमकेसह तामिळनाडूतील तमाम राजकीय पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत निषेध नोंदविला. हा लेख अधिकृत परवानगीशिवाय या वेबसाईटवर प्रकाशित केला. तो काढून टाकण्यात आला आहे, असे श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा लेख या वेबसाईटवर आल्यानंतर अवघ्या काही तासांत भारतात राजकीय वादळ उठले. (वृत्तसंस्था)
‘तो’ वादग्रस्त लेख हटविला श्रीलंका सरकारची माफी
By admin | Published: August 02, 2014 3:41 AM