ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 19 - सौंदर्य खुलवण्यासाठी सध्याच्या काळात सर्रासपणे मेक-अप केला जातो. त्यामुळे बऱ्याच जणींचा मेक-अप केलेला चेहरा आणि खरा चेहरा यात जमीन -अस्मानाचा फरक असल्याचे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिले असेल. संयुक्त अरब अमिरातीत घडलेल्या अशाच एका घटनेत मेक-अप उतरल्यावर पत्नीचे खरे 'रूप' पाहून हादरलेल्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे.
पत्नीचा खरा चेहरा आणि मेक- अप केलेला चेहरा यात मोठा फरक दिसतो. तिने मेक-अप केलेला नसल्यास मी तिला ओळखूही शकत नाही, असे कारण देत या पतीमहाशयांनी घटस्फोट घेतला आहे. हे अरब दाम्पत्य काही दिवसांपूर्वी शारजा येथील अल ममझार बिच येथे पोहण्यासाठी गेले होते. तेथे पोहताना मेक-अप उतरल्याने आपल्या पत्नीची चेहरेपट्टी बदलल्याचे पाहिले. पत्नीचा मेक-अप केलेला चेहरा आणि मेक-अपशिवायचा चेहरा यातील फरक पाहून त्याला धक्काच बसला. त्याला ती कुणीतरी अनोळखी महिलाच भासली. त्यामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले.
लग्नावेळी पत्नी जेवढी सुंदर दिसायची तेवढी सुंदर दिसत नाही. तसेच ती सौंदर्य खुलवण्यासाठी भरपूर सौंदर्य प्रसाधने वापरते. एवढंच नाही तर तिच्या डोळ्यांच्या पापण्यांचे केसही खोटे आहेत, असा आरोप पतीने केल्याचे गल्फ न्यूज ने म्हटले आहे.
या घटनेनंतर सदर महिलेला मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने मानसशास्त्र सल्लागार डॉ. अब्दुल अझीझ असाफ यांच्याकडे उपचारांसाठी विनंती केली आहे. या महिलेने आपले खरे रूप पतीसमोर आल्यावर स्पष्टीकरण देण्याचा खूप प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.