वाॅशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यावर गाेळीबार करणारा थाॅमस क्रुक्स याने गाेळीबारासाठी दाेन दिवस कसून सराव केला हाेता. एफबीआयच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. मात्र, तपास यंत्रणांना हल्ल्यामागील हेतू काय हाेता, याचा अजूनही उलगडा करता आलेला नाही.
ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेन्सिल्हानिया येथे एका सभेत गाेळीबार झाला हाेता. हल्लेखाेर २० वर्षीय थाॅमस याच्या हल्ल्यापूर्वीच्या हालचाली एफबीआयने ट्रॅक केल्या आहेत. थाॅमस हा ११ जुलै राेजी पिट्सबर्ग या शहरात फिरत हाेता. त्यानंतर ताे १२ जुलै राेजी क्लॅरटन स्पाेर्ट्स क्लबच्या शूटिंग रेंजमध्ये गेला. तेथे त्याने शूटिंगचा सराव केला. ताे या क्लबचा सदस्य हाेता. (वृत्तसंस्था)
थाॅमस क्रुक याने १३ जुलै राेजी एक शिडी खरेदी केली. त्याच दिवशी त्याने एका बंदुकीच्या दुकानातून ५० जिवंत काडतुसे खरेदी केली. त्याच गाेळ्या त्याने ट्रम्प यांच्यावर झाडल्या. हल्ल्यासाठी वापरलेली रायफल त्याच्या वडिलांच्या नावावर हाेती. त्याच्या कारमध्ये बाॅम्ब हाेता आणि त्याचा रिमाेट त्याच्याचकडे हाेता.
उपराष्ट्राध्यक्षपदाची जेम्स वेंस यांना उमेदवारी
राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्षपदासाठी जेम्स डेव्हीड वेंस यांच्या नावाची घाेषणा केली. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांनी ही घाेषणा केली.
वेंस यांच्या नावाला काेणत्याही प्रतिनिधीने विराेध केला नाही. वेंस हे २०२२ मध्ये प्रथमच ओहायाे येथून सिनेटर निवडण्यात आले हाेते. ते ट्रम्प यांचे जवळचे मानले जातात.
उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षातून विवेक रामास्वामी आणि निक्की हेली या दाेन भारतवंशीयांची नावेदेखील चर्चेत हाेती. हे दाेघेही राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत ट्रम्प यांच्याविराेधात उभे हाेते.