रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. राजधानी कीवच्या बाहेर दोन्ही देशांचं सैन्य आमनेसामने आलं आहे. कीव ताब्यात घेण्यासाठी रशियानं नागरी वस्त्यांमध्ये हल्ले सुरू केले आहेत. रशियाच्या या लष्करी कारवाईचा जगभरातून निषेध होत आहे. दुसरीकडे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये चर्चाही सुरू आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील महत्त्वाची आणि ऐतिहासिक चर्चेची पहिली फेरी बेलारूसमध्ये पार पडली होती. अनेक तास चाललेल्या बैठकीत प्रश्न सुटला नाही. मात्र पुन्हा एकदा रशिया-युक्रेन चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. रशिया-युक्रेन चर्चेची दुसरी फेरी उद्या म्हणजेच २ मार्च रोजी नियोजित आहे, रशियाच्या TASS वृत्तसंस्थेने मंगळवारी रशियन स्त्रोताचा हवाला देऊन अहवाल दिला आहे. त्यामुळे पहिल्या फेरीतल्या चर्चेंनंतर आता दूसऱ्या फेरीतल चर्चेकडे जगाचं लक्ष लागल आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठी चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी दोन्ही देशांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी मॉस्को आणि कीव येथे परततील. याआधीही युक्रेनने तात्काळ युद्ध थांबवण्याची आणि युक्रेनमधून रशियन सैनिकांना माघार घेण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर युक्रेनच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेत विशेष सत्र सुरू आहे. बहुतेक देशांनी रशियाने हल्ला थांबवण्याचा आणि चर्चेतून या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
रशिया हा दहशतवादी- वोलोडिमीर झेलेन्स्की
रशिया हा दहशतवादी देश आहे. रशियाचा हल्ला म्हणजे हा दहशतवादच आहे. रशियाच्या हल्ल्यात काल युक्रेनमधील १६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आमचे नागरिक या हल्ल्याची किंमत चुकवत आहेत. पण आमचा लढा स्वातंत्र्यासाठी असून आम्हाला इतर देशांचा पाठिंबा मिळत आहे. पण रशियाची ही वागणूक ना कोणी माफ करणार, ना कोणीही विसरेल, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं. त्यांनी आज युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केलं.