माणूस एवढी मरमर का करतो? इतकी धावाधाव खाआ करतो? कोणी कितीही श्रीमंत असो, कुणाच्या घरात अगदी कुबेर पाणी भरत असो किंवा ज्याची दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आहे, श्रीमंती कधीच आपल्या वाट्याला येणार नाही, अशी ज्याची स्वत:चीच पक्की खात्री आहे, अशी सारीच माणसं आयुष्यभर कष्ट उपसत असतात. आपलं आजचं वर्तमान आणि उद्याचा भविष्यकाळ सुखाचा जावो, आपल्याला नाही, तर किमान आपल्या मुलाबाळांना, कुटुंबीयांना तरी सुखाचे दिवस पाहायला मिळावेत, अशी साऱ्यांचीच इच्छा असते. त्याचबरोबर आणखी एक प्रबळ इच्छा बहुतेकांच्या मनात असते, ती म्हणजे हे आयुष्य संपल्यानंतर, पुढच्या जन्मी आपल्याला ‘स्वर्गप्राप्ती’ व्हावी, देवादिकांचं सान्निध्य आपल्याला मिळावं... यासाठीही ते जिवाचं रान करीत असतात. उतारवयातच स्वर्गप्राप्तीची आशा लोकांमध्ये बळावते असं नाही, काहींना तरुणपणीच या स्वप्नानं घेरलं जातं आणि मग आपल्याबरोबर आपल्या घरच्यांनाही या मार्गानं चालण्यासाठी ते प्रवृत्त करतात.
उद्याचं जाऊ द्या, उद्या कोणी पाहिलाय, आपल्याला याच जन्मी स्वर्गात जायचंय आणि ईश्वराची भेट घ्यायचीय, याची उत्कंठा किती पराकोटीची असावी? याचंच प्रत्यंतर नुकतंच केनियामध्ये पाहायला मिळालं. पूर्व आफ्रिकेतील केनिया हा एक गरीब देश. जगभरात अनेक लोकांना जशी स्वर्गप्राप्तीची आशा असते, तशीच इथल्याही लोकांना आहेच. त्यातच अनेकांचं आतापर्यंतचं आयुष्य हातातोंडाची गाठ घालण्यातच गेलेलं असल्यानं स्वर्गाची वाट दाखविणारा आणि त्यांना थेट स्वर्गात ईश्वराच्या चरणी बसविणारा कोणी मसिहा भेटला तर त्यांना किती आनंद होईल?
केनियाच्या या लोकांनाही तसाच आणि तितकाच आनंद झाला. आता आपल्या आयुष्याचं सार्थक झालं, आपल्या पुढच्या पिढ्यांंचंही कायमचं कोटकल्याण झालं, या आनंदानं त्यांचं मन अक्षरश: थुईथुई नाचू लागलं. त्याचं कारणही तसंच होतं. कारण ईश्वराची केवळ भेटच नाही, तर त्याच्याशी सुसंवाद घडवून देऊ शकणारा एक मसिहा त्यांना भेटला होता. त्यामुळे तो जे सांगेल, ते ऐकायला, तो जे म्हणेल, ते करायला त्यांची एका पायावर तयारी होती! कोण होता हा मसिहा, जो त्यांना स्वर्गात ईश्वराच्या पाटाला पाट लावून आणि मांडीला मांडी लावून बसविणार होता? तो होता एक धर्मगुरू! त्याचं नाव पॉल मॅकेन्झी एनथेंग. त्यानं आपल्या या भाविकांना काय सांगावं...? - तुम्हाला ईश्वराला प्रत्यक्ष पाहायचंय? त्याला भेटायचंय? समाेरासमाेर बसून त्याच्याशी गप्पा मारायच्यात? मी तुमची भेट घडवून देतो त्याच्याशी.. आपल्या धर्मगुरूचे हे शब्द ऐकल्याबरोबर या पापभिरू शिष्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आपला धर्मगुरू आपल्यासाठी अक्षरश: देवदूत बनून आपल्यासमोर आलाय, याबद्दल त्यांची खात्रीच होती. त्यात त्यानं अशी ‘ऑफर’ दिल्यानंतर तर त्यांच्या चित्तवृत्ती इतक्या प्रफुल्लित झाल्या की, आता या नश्वर देहाशी, नश्वर जगाशी त्यांचा जणू काही संबंधच उरला नाही.
या धर्मगुरूची एकच अट होती, ईश्वराला भेटायला जायचं तर भरल्या पोटी जायचं नाही. खाऊन-पिऊन तुडुंब झाल्यानंतर ईश्वराला भेटायला कसं जायचं? त्यासाठी उपाशीपोटी आणि सदेह, जिवंतपणीच त्याच्या भेटीला गेलं पाहिजे. - एवढं सोप्पं! हे तर आम्ही कधीही करू शकतो, त्याची आम्हाला सवयही आहे, असं म्हणून या भाविकांनी धर्मगुरूनं सांगितल्यानुसार स्वत:च आपली कबर खोदली, उपाशीपोटी त्यात स्वत:ला गाडून घेतलं. काय झालं मग? झाली का त्यांची ईश्वराशी भेट? त्यांच्या इतर अनुयायांपैकी काहींना वाटतंय, ‘पहिल्या दौऱ्यावरचे’ हे भाविक खरंच भाग्यवान, त्यांची आणि ईश्वराची नक्की भेट झाली असणार... गेल्या काही दिवसांपासून पोलिस मात्र मालिंदी शहराच्या आसपासच्या कबरींमधून एकामागून एक मृतदेह बाहेर काढताहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं ते जिवाचं रान करताहेत, कदाचित एखादी तरी व्यक्ती जिवंत सापडेल! आतापर्यंत त्यांना सत्तर कबरी आढळून आल्या आहेत आणि सोमवारी संध्याकाळपर्यंत त्यांनी ५० मृतदेह बाहेर काढले होते. अर्थातच मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ईश्वराच्या भेटीसाठी स्वर्गात जाऊ इच्छिणाऱ्या या लोकांमध्ये ज्येष्ठांबरोबरच तरुण आणि अगदी लहान मुलांचाही समावेश आहे..!
९०० जणांची सामूहिक आत्महत्या! अशीच एक घटना आहे १९५६ची. त्यावेळी एका तथाकथित धर्मगुरूच्या आश्रमावर सरकार कारवाई करणार होतं. हे समजताच या धर्मगुरूनं आपल्या शिष्यांना सांगितलं, पोलिस आपल्यावर गोळ्या झाडणार आहेत, आपल्याला अटक करणार आहे. असं दुर्दैवी मरण्यापेक्षा ‘पवित्र जल’ पिऊन आपण स्वत:च ‘दैवी’ मरण पत्करू. असं म्हणून विषयुक्त पाणी त्यानं शिष्यांना प्यायला दिलं. त्यात ९०० जणांना आपला जीव गमवावा लागला होता!