ऑनलाइन लोकमत
वेलिंग्टन, दि. ४ - गर्भवती प्रेयसीची हत्या केल्या प्रकरणी न्यूझीलंडमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आकाश (२४) असे दोषी विद्यार्थ्याचे नाव आहे. आकाशचे गुरप्रीत कौर या तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. गुरप्रीतने त्याला आपण तुझ्यापासून गर्भवती नसल्याचे सांगितल्यानंतर चिडलेल्या आकाशान चाकूने २९ वेळा भोसकून गुरप्रीतची हत्या केली.
१० एप्रिल रोजी वायकाटोच्या रस्त्यालगत गुरप्रीतचा मृतदेह आढळला होता. अटक केल्यानंतर आकाशने त्याचा गुन्हा कबूल केला नाही पण ऑगस्टमध्ये त्याने आपणच हत्या केल्याचे कबूल केले. आकाशचा गुन्हा क्रौर्याची परिसीमा गाठणारा आहे. आकाशला गुरप्रीत गर्भवती आहे हे माहित होते. तरीही त्याने पोटावर वार केले असे न्यायाधीश मॅथ्यू पालमेर यांनी निकाल सुनावताना सांगितले.
आकाश स्टुडंड व्हिसावर २०१३ पासून न्यूझीलंडमध्ये आहे. मनोरुग्ण असलेल्या आकाशवर औषधोपचार सुरु होते. १७ वर्ष न्यूझीलंडच्या तुरुंगात काढल्यानंतर त्याला भारतात पाठवून देण्यात येईल.