रियाध : सौदी अरबस्तानच्या राजघराण्यातील एक राजपुत्र तुर्की बिन सौद-अल-कबीर यांचा चार वर्षांपूर्वी केलेल्या खुनाची शिक्षा म्हणून मंगळवारी शिरच्छेद करण्यात आल्याचे सौदी सरकारने जाहीर केले.सौदी सरकारच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनाच्या हवाल्याने सरकारी वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले. तुर्की अल कबीर यांचे राजघराण्याशी नेमके काय नाते होते आणि त्यांना देहदंडाची शिक्षा नेमकी कशा प्रकारे दिली गेली, याचा तपशील सरकारने दिला नाही. डिसेंबर २०१२ मध्ये रियाधच्या बाहेर राजपुत्र कबीर व त्यांचे काही मित्र रात्रीच्या वेळी वाळवंटातील सफारीला गेले असता भांडणाच्या भरात कबीर यांनी त्यांच्यापैकी एकाला गोळी घालून ठार केले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये रियाध येथील न्यायालयाने कबीर यांना या खुनाबद्दल देहदंडाची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेची अंमलबजावणी आता करण्यात आली. ज्याचा खून झाला होता त्याचे चुलते अब्दुल रहमान अल-फलाज यांनी ‘देशाच्या न्याय्य न्यायसंस्थेकडून न्याय मिळाला’, अशा शब्दांत समाधान व्यक्त केले.राजा असो वा रंक, देशात सर्वांना समान कायदा लागू आहे, हे जनतेच्या मनावर बिंबविण्यासाठी गृह मंत्रालयाने राजपुत्र कबीर यांच्या मृत्यूदंडाची माहिती जाहीर करताना, जो कोणी असा गुन्हा करण्यास धजावेल त्यालाही शरियानुसार अशीच शिक्षा होईल, असे मुद्दाम नमूद केले.राजघराण्यातील व्यक्तीलाच अशा प्रकारे देहदंड दिला जाणे विरळा असले तरी असे यापूर्वीही घडले आहे. सन १९७५ मध्ये सौदी सम्राट फैसल यांच्या हत्येबद्दल राजघराण्यातीलच फैसल बिन मुसैद बिल अब्दुलअझीझ अल सौद यांना मृत्यूदंड दिला गेला होता. (वृत्तसंस्था)>कठोर शरियत कायदेसुन्नी पंथीय सौदी अरबस्तानात अत्यंत कठोर असे फौजदारी शरियत कायदे लागू आहेत. त्यानुसार खून, अमली पदार्थांचा व्यापार, सशस्त्र दरोडा व धर्मनिंदा अशा गंभीर गुन्ह्यांसाठी देहदंडाची तरतूद आहे. यासाठी दोषी ठरणाऱ्या आरोपीचा जाहीरपणे शिरच्छेद करण्याची पद्धत रूढ आहे.अॅमेनेस्टी इंटरनॅशनलने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक मृत्यूदंड देण्यामध्ये इराण व पाकिस्ताननंतर सौदी अरबस्तानचा तिसरा क्रमांक लागतो. राजपुत्र कबीर यांचा मृत्यूदंड यंदाच्या वर्षा तील १३४वा होता. गेल्या वर्षी एकूण १५८ जणांना देहदंड दिला गेला होता.
खुनाबद्दल राजपुत्राचा शिरच्छेद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2016 4:51 AM