ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 15 - लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेक जण वेळ घालवण्यासाठी कानाला हेडफोन लावून गाणी ऐकणे पसंत करतात. पण प्रवासामध्ये लिथियम बॅटरीवर चालणा-या उपकरणाचा जास्त वापर जीवावर बेतू शकतो. नुकताच बिजींग-ऑस्ट्रेलिया विमान प्रवासात एका महिलेने हा अनुभव घेतला. ही महिला कानाला हेडफोन लावून गाणी ऐकण्यामध्ये मग्न असताना अचानक हेडफोनमधल्या बॅटरीचा स्फोट झाला आणि हेडफोनने पेट घेतला.
या दुर्घटनेत महिलेचा हात आणि चेहरा भाजला आहे. 19 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. मी मानेभोवती हेडफोन गुंडाळलेला होता. मला चेह-यावर तीव्र जळजळ जाणवली. त्यामुळे मी हेडफोन काढून जमिनीवर फेकला. त्यावेळी हेडफोनला आग लागल्याचे मला समजले असे या महिलेने ऑस्ट्रेलियन वाहतूक सुरक्षा अधिका-यांना सांगितले. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
फ्लाईट अटेंडटनी तात्काळ जळणा-या हेडफोनवर पाणी ओतून आग विझवली. आगीमध्ये बॅटरी आणि कव्हर वितळून गेले होते. आग छोटीशी असली तरी, धुरामुळे काही प्रवाशांना त्रास झाला. हेडफोनमधल्या लिथियम आयन बॅटरीमुळे आग लागल्याचा निष्कर्ष तपास अधिका-यांनी काढला.
मागच्यावर्षी सॅमसंग गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची काही प्रकरण समोर आल्याने अनेक हवाई कंपन्यांनी विमान प्रवासात हा फोन वापरण्यावर बंदी घातली होती. मागच्या काही काळात लिथियम बॅटरीवर चालणा-या उपकरणांमध्ये स्फोट झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.