ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 21 - पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी अखेर आज संपली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय सुनावला नसून निकाल राखीव ठेवला आहे. न्यायालयाने नवाज शरीफ यांच्याविरोधात निर्णय दिल्यास त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात येऊ शकते.
तीन सदस्यीय खंडपीठासमोर संपुर्ण सुनावणी पार पडली. न्यायाधीश एजाज अफजल यांच्या अध्यतेखालील खंडपीठात शेख अजमत सईद आणि इजाजूल एहसान यांचा समावेश होता. सुनावणी पुर्ण झाल्यानंतर निकालासाठी कोणतीही तारीख त्यांनी जाहीर केली नाही. निकाल देत असताना कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं न्यायाधीस सईद यांनी यावेळी सांगितलं. "कोणाच्याही मुलभूत हक्कांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल", असं ते बोलले आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास पथकाने सादर केलेल्या अंतिम अहवालावरही चर्चा केली.
संबंधित बातम्या
पनामा पेपर्स लीक प्रकरणात 1990च्या दशकात शरीफ यांनी लंडनमध्ये घर खरेदी केल्यानंतर उघडकीस आलं होतं. शरीफ यांनी त्यावेळी दोनदा पाकिस्तानचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पनामा प्रकरण हे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांशी संबंधित आहे. त्यामुळे सत्तारूढ असलेल्या पीएमएल-एन पार्टीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जवळपास 700 हून अधिक पोलीस जवानांसिहत रेंजर्स आणि अधिका-यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नवाज शरीफ यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयान सहा सदस्यांची संयुक्त तपास पथक गठीत केलं होतं. या टीमने 60 दिवसांचा आपला तपासणी अहवाल 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. तपास पथकाने दिलेल्या अहवालात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासहित त्यांची मुलं हसन नवाज, हुसेन नवाज आणि मुलगी मरयम नवाजविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शिफारस केली होती.
तपास पथकाने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याच्या प्रती सर्व पक्षांना देत न्यायालयात येण्याआधी वकिलांना तयारी करुन येण्याचा आदेश दिला होता. नवाज शरीफ सरकारने मात्र हा अहवाल नाकारला असून षडयंत्र असल्याचा आरोप केला होता.
काय आहे पनामागेट प्रकरण?
पनामा पेपर लीक प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची देशाबाहेर मोठी संपत्ती असल्याचे आरोप आहेत. पनामा पेपर लिक झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यात अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय नेत्यांची देशाबाहेर मोठी संपत्ती असल्याचे उघडकीस आले होते. त्यात नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचेदेखील नाव आहे. गेल्या वर्षी ४ एप्रिल २०१६ रोजी अंतरराष्ट्रीय पत्रकांनी शरीफ यांचे नाव त्यात असल्याचे छापले होते.