नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हेरगिरी, घातपाती कारवाया करणे व बॉम्बस्फोट घडविणे या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सादर केलेल्या उत्तरावर पाकिस्तान आपले म्हणणे १७ जुलै रोजी सादर करणार आहे.या प्रकरणी आपले उत्तर सादर करण्यासाठी भारत व पाकिस्तानला हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २३ जानेवारी रोजी एका आदेशाद्वारे विशिष्ट मुदत दिली होती. त्यानुसार भारताने या न्यायालयात १७ एप्रिल रोजी आपले उत्तर कळविले होते. त्याला प्रत्युत्तर देणारे निवेदन आता पाकिस्तान सादर करणार आहे.पाकिस्तानची बाजू मांडणारे कायदेतज्ज्ञ खावर कुरेशी यांनी या खटल्यातील घडामोडींची माहिती पंतप्रधान नसिरुल मुल्क यांना दिली. त्यावेळी त्या देशाचे अॅटर्नी जनरल खालिद जावेद खान व अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. भारताला प्रत्युत्तर देणाऱ्या निवेदनाचा मसुदा खावर कुरेशी यांनीच तयार केला आहे. पाकिस्तानने आपले म्हणणे सादर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय हा खटला सुनावणीस घेणार आहे. मात्र ही सुनावणी यंदाच्या वर्षी होण्याची शक्यता कमी असल्याचे पाकिस्तानातील एका वकिलाने सांगितले. न्यायालयामध्ये पुढील वर्षीच्या मार्च-एप्रिल महिन्यात अन्य खटल्यांच्या तारखा याआधीच मुक्रर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यानंतरच जाधव खटला सुनावणीसाठी येऊ शकतो.केला व्हिएन्ना कराराचा भंगकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारताने गेल्या वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. जाधव यांना फाशी देण्यास पाकला मनाई करण्याचा आदेश न्यायालयाच्या १० सदस्यीय खंडपीठाने १८ मे रोजी दिला होता. जाधव यांच्याशी संपर्क साधण्यास भारतीय दूतावासाला मनाई केली आहे. ही कृती व्हिएन्ना कराराचा भंग करणारी आहे, असा आक्षेप भारताने नोंदवला होता.
कुलभूषण जाधव खटल्याची पुढील वर्षी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 5:00 AM