अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. अशातच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत.
अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. येथे ब्रिटीश आणि अमेरिकन सैनिकही भावूक झाले आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अशी अनेक दृश्य पाहून सैनिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. असाच एक काळजात चर्र करणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. आपल्या लेकाचा जीव वाचवण्यासाठी हतबल आईने बाळाला सैनिकाकडे सोपवलं आहे. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी काबुल एअरपोर्टवर अफगाण नागरिकांमध्ये अगतिकता दिसून आली आहे. मोठ्या संख्येने लोक आपल्या मुलांना घेऊन विमानतळावर पोहोचले.
अमेरिकन सैनिकांकडे आपल्या मुलांना वाचवा अशी नागरिक मदतीची याचना करत आहेत. याच दरम्यान एका कुटुंबाने तालिबानच्या दहशतीमुळे आपल्या बाळाला सैनिकांकडे सोपवलं. ज्यानंतर सैनिकांनीही बाळाला उचलून घेतलं. रडत रडत आई-बापाने आपल्या बाळाच्या वाचवण्यासाठी अमेरिकन सैनिकाकडे मदतीची याचना केली. त्यानंतर एक सैनिक ताऱ्यांच्या कुंपणावरुन खाली झुकला आणि बाळाचा उचलून घेतलं. हे पाहून घटनास्थळावरील सैनिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे.
हाहाकार! काबुल विमानतळाच्या कुंपणावरून चिमुकल्यांना फेकताहेत महिला; जीव वाचवण्यासाठी धावपळ
तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. अशातच काबूल विमानतळावर अमेरिकी, ब्रिटनचे सैनिक आणि अफगाण नागरिकांना वेगवेगळं करण्यासाठी तारेचं कुंपण घालण्यात आलं आहे. परंतु देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही अफगाणी महिला आपल्या लहान मुलांना तारेच्या कुंपणापलीकडे फेकताना दिसत आहेत. अशातच काही मुलं या कुंपणांमध्येच अडकून पडल्याचा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. काबूल विमानतळावर हताश नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक महिला आपल्या मुलांना घेऊन विमानतळावर धावताना दिसत आहेत. अफगाणी महिला आपली मुलं रेंजर तारांवरुन पलीकडे फेकत होत्या. हे दृश्य खरोखरच भयानक होतं. सैनिकांनी आपल्या मुलांना घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र यातील काही मुलं तारांमध्येच अडकून पडली असल्याचं म्हटलं आहे.