कोरोना विरोधातील लढाईमध्ये भारताने अवघ्या जगाला आशेचा किरण दाखविला आहे. भारतात पुन्हा कोरोना परतला असून रुग्ण वाढू लागले आहेत. अशातदेखील देशात खरी गरज असताना भारताने जगाशी असलेले देणे न विसरता कोरोना लस विविध देशांना पुरवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताने दोन लाख कोरोना लसीचे डोस दिले आहेत. (S jaishankar Offers 2 lakhs corona vaccine dose for UN peacekeepers.)
संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात जागतिक लढाईसाठी आणि जागतिक बाजारात कोरोना लसीच्या अत्यावश्यक पुरवठ्याच्या प्रयत्नांबाबत भारताची स्तुती केली आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी़ एस़ तिरुमूर्ति यांनी शनिवारी ट्विट करून यांची माहिती दिली. गुटारेस यांनी 17 फेब्रुवारीला भारताला आभारप्रदर्शन करणारे पत्र पाठविले. यामध्ये त्यांनी कोरोना लढ्यासाठी भारताने 2 लाख डोस दिले, याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वैयक्तीक आभार मानले आहेत.
तिरुमूर्ति यांनीदेखील संयुक्त राष्ट्र प्रमुखांचे आभार व्यक्त केला आहेत. कोरोना महामारीविरोधात लढण्यात भारत एक जागतिक नेता बनला आहे. 150 पेक्षा अधिक देशांना महत्वाची औषधे, किट आणि व्हेंटिलेटर तसेच वैयक्तिक सुरक्षा उपकरणे देऊन भारताने जागतिक महामारीविरोधात लढण्याच्या प्रयत्नांना बळ दिले आहे. यामुळे भारत हा खरोखरच जागतिक नेता बनला आहे, असे गुटारेस यांनी पत्रात म्हटल्याचे तिरुमूर्ति यांनी ट्विट केले आहे.
डब्ल्यूएचओने आपत्कालीन वापरासाठी नुकत्याच दोन लसींना परवानगी दिली आहे. यापैकी एक लस ही भारतात विकसित आणि तयार झाली आहे. भारताने ही लस जगासाठी दिली आहे. कोव्हॅक्स सुविधेला समर्थन देणे आणि त्यासाठी प्रयत्न केले, म्हणून मी भारताचे आभार मानत आहे, असे गुटारेस यांनी म्हटले आहे.
जगभरात एकूण 12 मोहिमांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे एकूण 94,484 कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये 121 देशांचे लोक काम करतात. ज्यामध्ये सर्वाधिक सैनिक हे भारताचे आहेत. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी, काही दिवसांपूर्वी युएनच्या बैठकीत या शांतीदुतांना 2 लाख कोरोना लसीचे डोस भेट म्हणून देणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी भगवतगीतेचा उल्लेख करत नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाची बाब मनात ठेवून आपले काम करावे, असेही म्हटले होते.