टोकियो - मुसळधार पाऊस आणि महापुराच्या तडाख्यातून नुकत्याच सावरत असलेल्या जपानला आता कडक उन्हाळ्याचा तडाखा बसला आहे. गेल्या आठवड्यापासून मंगळवारपर्यंत जपानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 65 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे 22 हजार 647 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जपानमधील फायर अँड डिझास्ट्र मॅनेजमेंट एजन्सीने ही माहिती दिली आहे. एजन्सीने सांगितले की, ते 2008 पासून उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंद ठेवत आहेत. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास यावर्षी सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत उष्णतेच्या प्रकोपामुळे 80 जणांच मृत्यू झाला आहे. सुमारे 35 हजार लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. हा मुलगा खेळून घरी येत असताना बेशुद्ध झाला. नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सरकारचे प्रवक्ते योशिदे सुगा यांनी सांगितले की, भयंकर लू ने देशाला आपल्या कवेत घेतले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आपातकालीन पावले उचलावी लागणार आहेत. सरकारी शाळांना वातानुकूलित बनवण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. सद्यस्थितील जपानमधील अर्ध्या शाळांमध्ये एसी लावण्यात आले आहेत. तसेच मुलांना उष्णतेच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी उन्हाळ्याची सुटी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. सोमवारी कुमागया शहरातील तापमान 41.1 सेल्शियस नोंदवले गेले होते. त्याशिवाय टोकीयोतील शहरी भागात तापमानाने 40 डिग्रीचा आकडा पार केला होता. तसेच जपानमधील बहुतांश भागात सध्या तापमान हे सरासरीपेक्षा अधिक आहे.
जपानमध्ये उष्णतेचा'चा प्रकोप, 65 जणांचा मृत्यू, 22 हजार रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 2:47 PM