टोकियो : जपानच्या दक्षिणी भागात जोरदार पाऊस कोसळत असून येथील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. या आस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी 14 हजार सैनिकांना अलर्ट देण्यात आला आहे. कागोशिमा शहरात पावसाचे रौद्ररूप पाहून प्रशासनाने 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या भागात पाऊस सुरू आहे आणि पुढील काही दिवस धो धो कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे सततच्या पावसामुळे या भागात पूर किंवा भूस्खलन होण्याची भीती जपानच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. यामुळे सतर्क राहत लोकांना परिसर सोडण्यास सांगितले आहे. तसेच लोकांनी घर न सोडल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
कागोशिमा हे शहर क्यूशूच्या दक्षिणी खाडीला लागून आहे. या बेटाच्या काही भागात गेल्या आठवड्यात 900 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कागोशिमामध्ये मंगळवारी सकाळी तासाभरात 40 मिमी पावसाची नोंद झाली. स्थानिक वृत्तवाहिनीनुसार गुरुवारी सकाळपर्यंत 350 मिमी पावसाची शक्यता आहे. तर काही भागात प्रति तासाला 80 मिमी पावसाची शक्यता आहे.