मॉस्को - रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रेकॉर्डब्रेक बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मॉस्कोमध्ये शनिवारपासून जोरदार वारे वाहत असून, तुफान बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मॉस्कोच्या इतिहासात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी बर्फवृष्टी असल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी तब्बल 43 सेंमी बर्फ पडला. याआधी 1975 मध्ये जवळपास 38 सेंमी बर्फ पडला होता.
मॉस्कोमधील अधिका-यांनी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. झाड अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरभरात जवळपास दोन हजार झाडं पडली आहेत.
बर्फवृष्टीमुळे तीन हजारांहून जास्त घरांची वीज गायब झाली आहे. हवामान खात्याने अजून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याचा तसंच तापमानात घट होण्याचा इशारा दिला आहे. रशियातील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मॉस्कोमध्ये तापमान उणे 7 ते 2 डिग्री सेल्सिअस असू शकतं. बर्फवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या ठिकाणांवर वाहतूक व्यवस्थापन योग्य ठेवण्यासाठी कार्यरत राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.