ढाका:बांगलादेशमध्ये एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. शाल्ला उपजिल्हा येथील सुनामगंजमध्ये असलेल्या एका हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या हजारो समर्थकांनी सशस्त्र हल्ला करत सुमारे ८० घरांची नासधूस केल्याची माहिती मिळाली आहे. या संघटनेच्या काही नेत्यांनी एका कार्यक्रमाला सोमवारी हजेरी लावली होती. त्यावेळी देण्यात आलेल्या भाषणामध्ये हल्ला झालेल्या गावातील एका व्यक्तीने फेसबुक पोस्टमधून एका धर्मगुरुंच्या वक्तव्याचा निषेध केल्याचा उल्लेख करण्यात आला. यावरून हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. (hefazat e islam supporters attack sunamganj hindu village in bangladesh)
‘ढाका ट्रिब्यून’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. हबीबपूर युनियनचे अध्यक्ष असणाऱ्या विवेकानंद मुजूमदार बाकूल यांनी या गावातील अनेक घरांवर हल्ला झाल्याची माहिती दिल्याचे यात म्हटले आहे. या गावातील अनेक हिंदू कुटुंबांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गाव सोडल्याची माहिती मिळत आहे. अनेक हिंदूंनी गाव सोडल्यानंतर हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या समर्थकांनी गावामध्ये अनेक घरांची तोडफोड केली असून, घरातील वस्तू चोरल्याची माहितीही समोर आली आहे.
कृषी कायदे मागे घेतले नाही, तर गोदामांना लक्ष्य करू; राकेश टिकैत यांचा थेट इशारा
फेसबुक पोस्टमुळे घडला प्रकार
देराई उपजिल्हा येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेचे आमिर अल्लामा जुनैद बाबुनागुराई, व्यवस्थापकीय सह-सचिव मौलाना मुफ्ती मामुनुल हक आणि संघटनेच्या इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावलेली. यावेळी बोलताना मामुनुल हक यांनी आपल्या भाषणामध्ये नौगाव येथील एका हिंदू तरुणाने फेसबुकवर केलेल्या पोस्टचा उल्लेख करत यात आपल्यावर टीका करण्यात आल्याचे सांगितले. बांगबंधुंच्या शिल्पावरुन मामुनुल हक यांनी मांडलेल्या मतावर या पोस्टमध्ये टीका करण्यात आली होती. याच भाषणानानंतर बुधवारी हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या हजारो समर्थकांनी या गावावर सशस्त्र हल्ला केला.
धार्मिक मुद्यावरुन हिंसा घडवण्याचा प्रयत्न
हिंदू व्यक्तीने केलेल्या पोस्टचा उल्लेख भाषणामध्ये करण्यात आल्यानंतर हिफाजतच्या स्थानिक नेत्यांनी मंगळावारी रात्रीपासूनच सुमानगंजमध्ये आंदोलन करुन निषेध नोंदवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काशीपूर, नाचीन, चंदीपूर आणि इतर भागातील मुस्लीम समाजातील व्यक्तींनी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास नौगाववर हल्ला केला. येथील हिंदू वस्तीवर हल्ला करत त्यांनी अनेक घरांची नासधूर केली.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी एका युवकाला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील ७० ते ८० घरांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.