इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. त्यानंतर हे हेलिकॉप्टर आणीबाणीच्या स्थितीत उतरवण्यात आले. इराणधील सरकारी वृत्तवाहिनीकडून ही माहिती देण्यात आली आहे. हेलिकॉप्टरला अपघात झाला तेव्हा त्यामध्ये राष्ट्रपतींसोबत देशाचे वित्तमंत्रीही स्वार झालेले होते. दरम्यान, या हेलिकॉप्टरचं अझरबैजानमधील भागात हार्ड लँडिंग करण्यात आलं आहे. तसेच घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इराणच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यामध्ये तीन हेलिकॉप्टर होते. त्यामधील दोन आपल्या निर्धारित ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचले. मात्र एक हेलिकॉप्टर हे अपघातग्रस्त झालं. इराणच्या सरकारी टीव्हीने सांगितले की, ही दुर्घटना इराणच्या राजधानीपासून सुमारे ६०० किमी दूर अंतरावर असलेल्या अझरबैजान या देशाच्या सीमेवर असलेल्या जोल्फा या शहराजवळ घडली.
रईसी हे रविवारी अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव यांच्यासोबत एका धरणाचं उद्घाटन करण्यासाठी अझरबैजानमध्ये गेले होते. दोन्ही देशांनी असार नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे. इराणचे ६३ वर्षीय राष्ट्रपती रईसी हे कट्टरतावादी असून, त्यांनी इराणच्या न्यायपालिकेचं नेतृत्वही केलेलं आहे. रईसी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे शिष्य मानले जातात.