मुंबई, दि. 12 - आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण एक ना अनेक गोष्टींची तक्रार करत असतो. देवाने सर्व काही दिलं असतानाही जे नाही त्याबद्दलच जास्त तक्रार होत असते. मग अशावेळी आपण किती चुकीचा विचार करत आहोत याची जाणीव करुन देणा-या काही गोष्टी आजूबाजूला दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहून कदाचित तुम्हालाही आपण किती नशिबवान आहोत याची जाणीव होईल. या व्हिडीओमध्ये एक अपंग मुलगा दोन हात, दोन पाय नसतानाही कोणाच्या मदतीशिवाय पाय-या चढून जातो. घसरगुंडीवर जाण्यासाठी त्याने केलेली ही धडपड आणि यशस्वी मोहिम पाहून आपल्याही संघर्षाला बळ मिळतं.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोमवारी हा प्रेरणादायी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तो शेअर केला असून प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, 'सुरुवातीला हा व्हिडीओ पाहण्याची हिंमत होत नव्हती. पण नंतर मला प्रेरणा मिळाल्याची जाणीव झाली. यापुढे कितीही कठीण काम असेल तर मी तक्रार करेन असं वाटत नाही'.
दोन मिनिटांच्या या व्हीडीओत तीन ते चार वर्षांचा हा चिमुरडा घसरगुंडीवर जाण्यासाठी पाय-या चढताना दिसत आहे. हात आणि पाय नसल्याने पाय-या चढणं या चिमुरड्यासाठी किती कठीण जात असेल हे व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं. मात्र अशा अनुकूल परिस्थितीतही माघार न घेता चिमुरडा पाय-या चढण्यासाठी पुढे सरसावतो. आपण असतो तर कदाचित माघार घेतली असती, पण चिमुरड्याने हार न मानता आपली पावलं पुढे टाकण्यास सुरुवात केली. घसरत घसरत तो पाय-या चढण्यास सुरुवात करतो.
हात, पाय नसल्याने पाय-या चढण्यासाठी साधी गोष्ट त्याच्यासाठी कठीण होऊन बसली होती. पण हे जमणार नाही असं एकदाही तो चिमुरडा बोलत नाही. उलट आपल्या हाती येणा-या अपयशाला तो हसून दाद देत आहे, आणि पुन्हा पाय-या चढण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी व्हिडीओ शूट करत असलेली त्याची आई प्रेरणा देण्याचं काम करत होती. पाय-या चढताना कदाचित त्याला त्रासही होत असावा, पण संपुर्ण व्हिडीओ पाहताना हे अजिबात जाणवत नाही. अखेर जेव्हा चिमुरडा घसरगुंडीवर पोहोचतो तेव्हा आपण विजयी झाल्याचं त्याच्या चेह-यावरील समाधान पाहून एका क्षणासाठी आपणही सुखावतो.
अमिताभ बच्चन यांनीदेखील हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. 'खूपच प्रेरणादायी ! सुरुवातीला पाहताना त्रासदायक होतं. मात्र ज्याप्रकारे आई आपल्या मुलाला प्रोत्साहन देत आहे, ते नक्की पहा', असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं आहे.