नवी दिल्ली - इस्त्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा चंद्राच्या पृष्टभागापासून केवळ २ किमी अंतरावर असताना संपर्क तुटला होता. तेव्हापासून विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, चंद्राच्या पृष्टभागावर हार्डलँडिंग केल्यापासून संपर्क तुटलेल्या विक्रमशी आता नासानेही संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी नासाकडून विक्रमला ''हॅलो'' मेसेज पाठवण्यात आला आहे. ७ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरचा चंद्राच्या पृष्टभागापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असताना संपर्क तुटला होता. त्यानंतर विक्रमचे हार्ड लँडिंग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा इस्रोकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नासाने विक्रम लँडरला रेडिओ संदेश पाठवला आहेत. नासाने डीप स्पेस नेटवर्कच्या जेट प्रपल्शन लॅब्रटरीमधून विक्रमला हा रेडिओ संदेश पाठवला आहे. इस्रोच्या लिखित सहमतीनंतर नासा रेडिओ संदेशांद्वारे विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असे नासामधील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विक्रमचे चंद्राच्या पृष्टभागावर हार्डलँडिंग होऊन आता सहा दिवस उलटले आहेत. यादरम्यान, विक्रमशी संपर्क न झाल्याने आता त्याच्याशी संपर्क होण्याची शक्यता हळुहळू धुसर होत आहे. विक्रमसाठी निश्चित करण्यात आलेल्या योजनेनुसार त्याला केवळ एक चांद्रदिवस म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवस एवढा वेळ सूर्याचा थेट प्रकाश मिळणार होता. त्यामुळे या काळातच इस्रोकडून विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू राहील. त्यानंतर मात्र चंद्रावरील अंधाऱ्या रात्रीत या यानाशी संपर्क साधणे अशक्य होईल. त्यामुळे २०-२१ सप्टेंबरपर्यंत विक्रमशी संपर्क न झाल्यास त्याच्याशी संपर्क होण्याची आशा संपुष्टात येईल.
हॅलो विक्रम! संपर्क तुटलेल्या यानाला नासाने पाठवला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 5:40 PM