वाॅशिंग्टन : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियालाचीनकडून होत असलेल्या शस्त्रपुरवठ्याबद्दल अमेरिकेने चीनला कडक इशारा दिला आहे. रशियाला मदत करणाऱ्या चीनला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांना शनिवारी झालेल्या भेटीत बजावले.
म्युनिक येथे झालेल्या सुरक्षा परिषदेत या दोन नेत्यांची भेट झाली. ब्लिंकन यांनी वांग यी यांना सांगितले की, अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचा भंग होईल, अशी कोणतीही कृती चीनकडून पुन्हा घडता कामा नये. अमेरिकेच्या हवाई हद्दीत चीनचे बलून आढळून आले होते. ते हेरगिरीसाठी सोडण्यात आले होते, असा अमेरिकेला संशय होता. त्या पार्श्वभूमीवर ब्लिंकन यांनी चीनला इशारा दिला. त्यावर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सांगितले की, अमेरिकेने चिनी बलूनविरोधात केलेली कारवाई अयोग्य होती. आकाशात अनेक प्रकारची बलून आहेत. ही सर्व बलून अमेरिका लढाऊ विमानांद्वारे पाडणार आहे का, असा सवालही त्यांनी ब्लिंकन यांना विचारला.
‘चीनकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग’अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते निड प्राईस यांनी सांगितले की, चीनने हवेत सोडलेल्या बलूननी ४०हून अधिक देशांमध्ये प्रवास केला. या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कायदे व विविध देशांच्या सार्वभौमत्वाचा भंग झाला आहे. चीनचे बलून अमेरिकेने पाडल्यामुळे या दोन देशांतील तणाव आणखी वाढला आहे. तैवानवर चीनने लष्करी कारवाई केल्यास अमेरिका तत्काळ हस्तक्षेप करेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सरकारने याआधीच दिला होता. त्यामुळेही चीन- अमेरिकेचे संबंध ताणले गेले होते.
चीनचा आरोपअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने देशांतर्गत प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी बलून पाडण्याची कारवाई केली, असा आरोप चीनने याआधी केला होता.