हमासच्या हजारो रॉकेटना रोखत दहशतवादी संघटनेविरोधात युध्द पुकारणाऱ्या इस्रायलसमोर इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती आली आहे. युद्ध रोखण्यासाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय संघटनांकडून प्रचंड दबाव येत असून, रोखले तर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा मित्रपक्षांनी दिला आहे.
यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता इस्रायल राफावर हल्ल्याची तयारी करत आहे. गाझा युद्ध सुरु होऊन कित्येक महिने लोटले तरी हमासकडे बंदी असलेल्या नागरिकांची सुटका करता आलेली नाहीय. नेतन्याहू यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला आहे. युद्ध न रोखल्यास इस्रायलवर विविध बंधने आणली जाणार आहेत. तर दुसरीकडे जर राफावरील हल्ला रोखला गेला तर आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, असा इशारा मित्रपक्षांनी दिला आहे. असे झाले तर नेतन्याहू सरकार कोसळणार आहे.
युद्धविरामासाठी हमासचे प्रतिनिधी जोरदार प्रयत्न करत असून ते सोमवारी इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचले आहेत. लवकरात लवकर युद्ध थांबविण्याची चर्चा सुरु करण्याचा मध्यस्थींचा प्रयत्न आहे. राफा शहरावर हल्ला करण्याची तयारी इस्रायलने केली आहे. हे शहर इजिप्तच्या सीमेवर असून तिथे मोठ्या संख्येने गाझाच्या लोकांनी आश्रय घेतला आहे. तिथे हल्ला झाल्यास मोठ्या प्रमाणावर लोक मारले जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा हमासने उचलला असून तिथेच अड्डाही हलविला आहे. या कारणामुळे अमेरिकाही इस्रायलवर दबाव आणत आहे.
युद्ध रोखले तर तो इस्रायलचा पराभव असेल, असे मत नेतन्याहूंच्या मित्रपक्षांचे आहे. राफावर हल्ला करावा असा सल्ला त्यांचे अर्थमंत्री बेजालेल स्मोट्रिच यांनी दिला आहे. युद्ध थांबवले तर नेतन्याहूंना सरकारमध्ये राहण्याचा हक्क नाही. यामुळे आम्ही पाठिंबा काढून घेऊ, असे ते म्हणाले आहेत. हमासकडे अद्यापही १३० बंदी आहेत.