ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ५ - प्रत्येक समाजामध्ये विवाहाच्या वेगवेगळया प्रथा, परंपरा असतात. विवाहसोहळयाच्यावेळी या परंपरांमधून आनंदही मिळतो. पण बांगलादेशातल्या मंडी समाजामध्ये विवाहाची एक वेगळीच प्रथा आहे. ही प्रथा सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारी आहे. या समाजातल्या प्रथेनुसार मुलीचा तिच्याच वडिलांबरोबर विवाह होतो.
मुलीचा आणि तिच्या आईचा पती एकच असतो. मंडी समाजातल्या ओरोला डालबोट (३०) या महिलेने सांगितले की, ती लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. तिच्या आईने नोटेन नावाच्या माणसाबरोबर दुसरा विवाह केला. मी मोठी होत असताना नोटेन मला आवडायचे. माझी आई भाग्यवान आहे असे मला वाटायचे. त्याच्यासारखा पती मिळावा अशी माझी इच्छा होती.
ओरोला वयात येत असताना एकदिवस तिला नोटेन बरोबर तिचा विवाह झाल्याचे सांगण्यात आले आणि तिला एकच धक्का बसला. ओरोला तीन वर्षांची असताना आईच्या दुस-या विवाहाच्या मंडपातच तिचा नोटेबरोबर विवाह लावून देण्यात आला होता. या मंडी समाजामध्ये विधवा महिलेचा पतीच्याच कुटुंबातील तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पुरुषाबरोबर पुनर्विवाह लावून दिला जातो.
जेव्हा नोटेन माझा पती असल्याचे मला समजले तेव्हा मला धक्काच बसला. मला पळून जायचं होत. पण मी हे सत्य स्वीकारलं पाहिजे असं मला आईने समजावलं अस ओरोलाने सांगितले. या समाजात विधवेला पुनर्विवाह करताना आपली एक मुलगी दुसरी पत्नी म्हणून दुस-या पतीला द्यावी लागते. वयात आल्यानंतर या मुलीबरोबर पतीचे शरीरसंबंध सुरु होतात.