ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - संशोधकांना दशकांपासून न उलगडलेले अटलांटिक महासागरातील 'बर्म्युडा ट्रँगल'चे रहस्य अखेर समोर आले आहे. आतापर्यंत बर्म्युडा ट्रँगलमुळे हजारो जणांचा बळी गेला आहे, 75 हून अधिक विमाने आणि 100 पेक्षा जास्त जहाजं बेपत्ता झाली आहेत. या परिसरात विमान आणि जहाजे बेपत्ता होण्यामागे 'षटकोनी आकाराचे ढग' असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 'डेली मेल'ने यासंदर्भातील बातमी छापली आहे.
संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, ' षटकोनी आकाराचे ढग (हेक्झागॉन क्लाउड) आणि सोबत वाहणा-या हवेमध्ये एखाद्या बॉम्ब किंवा स्पोटकाप्रमाणे शक्ती तयार होते. याचदरम्यान 170 मैल प्रति तास या वेगाने वारेही वाहतात. हे ढग आणि हवा, विमान आणि जहाजांवर आदळल्यामुळे अपघात घडत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याच कारणामुळे माणसांसहीत विमान आणि जहाजे बेपत्ता होत असावीत, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. 500,000 किलोमीटर चौरसपर्यंत पसरलेला या पट्टा गेली अनेक वर्षे कुप्रसिद्ध आहे. हवामानशास्त्रज्ञ रेंडी सर्व्हनी यांच्यानुसार, हे षटकोनी आकाराचे ढग स्फोटाप्रमाणे परिस्थिती निर्माण करतात, ज्यामुळे आजूबाजूच्या सर्व गोष्टी उद्ध्वस्त होतात. वेगाने वाहणारे वारे ढगांना भेदत जाऊन समुद्रांच्या लाटांवर येऊन आदळतात, यामुळे त्सुनामीपेक्षाही उंच लाटा उसळतात. यातून विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते.
यादरम्यान आजूबाजूला असलेल्या गोष्टी उद्ध्वस्त होतात. संशोधकांनुसार, 'बर्म्युडा ट्रँगल बेटाच्या दक्षिणेकडे या षटकोनी आकाराच्या ढगांची निर्मिती होते, त्यानंतर जवळ-जवळ 20 ते 55 मैल प्रवास करुन ते ढग या रहस्यमय पट्ट्यात दाखल होतात'. गेल्या अनेक वर्षांपासून बर्म्युडा ट्रँगलबाबत अनेक चर्चा झाल्या, अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या. मात्र बेपत्ता झालेली माणसे, जहाजे तसेच विमानांचे अवशेष अद्यापपर्यंत सापडलेले नाही.