इस्रायल सातत्याने हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत त्यांच्या अड्यांवर हवाई हल्ले करून, त्यांचा नायनाट करत आहे. यातच, आता इस्रायलने हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याचा मोठा दावा केला आहे. इस्रायली संरक्षण दलाने एक्सवर पोस्ट करत, आता हसन नसराल्लाह जगात दहशत पसरवू शकणार नाहीत, असे म्हटले आहे. हसन नसरल्ला 32 वर्षे हिजबुल्लाहचा प्रमुख होता.
हवाई हल्ल्यात नसरल्लाहचा खात्मा - इस्रायली लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनन्ट कर्नल नादाव शोशानी यांनी एक्सवर पोस्ट करत नसरल्लाहच्या खात्म्याची माहिती दिली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डेव्हिड अव्राहम यांनी सांगितले की, "लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतमध्ये शुक्रवारी (27 सप्टेंबर 2024) करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुकाचा खात्मा झाला आहे. हसन नसराल्लाहला मारण्यासाठी ऑपरेशन NEW ORDER राबवण्यात आले होते." एवढेच नाही तर, जो कुणी इस्रायलला धमकी देईल, त्याच्यापर्यंत कसे पोहोचायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे. नागरिकांना दहियाह शहर रिकामे करण्याचे आदेश -टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, त्यांनी काल हिजुबल्लाहच्या हेडक्वार्टरवर हल्ला केला होता. तेथे हसन नसरल्लाह देखील उपस्थित होता. इस्रायली सैनिक बेरूतसह विविध भागांत सातत्याने हल्ला करत आहे. एवडेच नाही तर, आयडीएफने बेरूतच्या दहियाह शहरात राहणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर हा भाग रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. हिजबुल्लाह या भागाचा उपयोग इस्रायलवर हल्ला करण्यासाठी करत असल्यचे आयडीएफचे म्हणणे आहे.
नसराल्लाहच्या मुलीचाही मृत्यू -इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नसराल्लाहशिवाय त्यांची मुलगी जैनबचाही या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इस्रायलने हल्ला केलेल्या कमांडर सेंटरमध्ये नसरल्लाहच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. यापूर्वी शुक्रवारी रात्री इस्रायलने हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागले होते, ज्यात 6 जणांचा खात्मा झाला होता, तर 90 जण जखमी झाले होते.