बेरूत : इस्त्रायली लष्कराची गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. यामुळे इस्रायलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. इस्रायलच्या ग्राउंड मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण लेबनॉनमधील मोसाद या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाला लक्ष्य केल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे.
रिपोर्टनुसार, लेबनीज अतिरेकी गट हिजबुल्लाहने हर्झलियाजवळील ग्लिलोट तळावर 'फादी-४' क्षेपणास्त्र डागले. हिजबुल्लाहचा हा हल्ला रोखण्यात आयडीएफचे लष्करी गुप्तचर युनिट आणि मोसाद मुख्यालय अपयशी ठरल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, 'फादी-४' हे हिजबुल्लाहचे सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीनुसार, मीडिया सूत्रांनी मंगळवारी सकाळी सांगितले की, हिजबुल्लाहच्या इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये सायरन वाजले. अलार्म सायरनच्या आवाजाने तेल अवीवसह व्यापलेल्या पॅलेस्टाईनच्या संपूर्ण मध्यवर्ती भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अल मनारने झिओनिस्ट सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, तेल अवीव हवाई क्षेत्रात अनेक स्फोट ऐकू आले. दरम्यान, सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओंमध्ये हिजबुल्लाह क्षेपणास्त्रे इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी प्रदेशांवर हल्ला करताना दिसत आहेत. तेल अवीवच्या दिशेने ५ क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त एका इस्रायली वृत्तपत्राने दिले आहे. तसेच, इस्त्रायली लष्करानेही लेबनॉनमधून क्षेपणास्त्र हल्ल्यांची माहिती दिली.
इस्रायलने हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला दुजोरा दिला आहे. मात्र, हा हल्ला मोसादच्या मुख्यालयावर झाल्याचे सांगण्यात आले नाही. आयडीएफने सांगितले की, हिजबुल्लाहने उडवलेले क्षेपणास्त्र थेट मध्य इस्रायलमधील काफ्र कासेम या अरबी गावात पडले. हिजबुल्लाहने या भागात क्षेपणास्त्र हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हिजबुल्लाहला फक्त इस्रायली लोकांचे नुकसान करायचे आहे. इस्रायलने त्याचा व्हिडिओही जारी केला आहे.