Israel Hezbollah War : बेरूत : इस्रायलकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांना आता हिजबुल्लाहने प्रत्त्युतर देण्यास सुरुवात केली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या निवासी भागांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हिजबुल्लाहने लेबनॉनमधून ४० रॉकेट इस्त्रायलच्या अप्पर गॅलीलीच्या निवासी भागात डागले. त्यापैकी काही इस्रायलच्या हवाई संरक्षणाद्वारे निकामी करण्यात आले. परंतु उर्वरित रॉकेट निवासी भागात पडले.
या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त समोर आले नाही. दरम्यान, हिजबुल्ला या दहशतवादी समूहाशी वाढता तणाव पाहता राखीव सैनिकांना सक्रिय करत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हवाई हल्ल्यानंतर इस्त्रायली लष्कर आता लेबनॉनमध्ये जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. आयडीएफने नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरला आपल्या सैन्याला कारवाईसाठी पूर्णपणे तयार करण्यास सांगितले आहे.
नॉर्दर्न कमांडचे कमांडिंग ऑफिसर एमजी ओरी गॉर्डिन यांनी ७ व्या ब्रिगेडच्या सुरू असलेल्या सरावाची पाहणी केली. तसेच, यासंबधी तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, इस्त्रायल लेबनॉनमधील हिजबुल्लाविरुद्ध आणखी कठोर कारवाईची योजना आखत आहे, असे बुधवारी केलेल्या घोषणेवरून दिसून येत आहे. हिजबुल्लाहने पहिल्यांदा तेल अवीवच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्यानंतर काही तासांनी ही घोषणा करण्यात आली.
इस्त्रायली लष्कराने सांगितले की, ते उत्तरेकडील प्रदेशात सुरू असलेल्या मोहिमेसाठी दोन राखीव ब्रिगेडला पाचारण करत आहेत. यामुळे दहशतवादी संघटना हिजबुल्लाविरुद्धचा लढा सुरू ठेवण्यास मदत होईल, असे लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी इस्त्रायलने लेबनॉनमध्ये कार्यरत असलेल्या हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेवर तांत्रिक युद्धाच्या माध्यमातून हल्ला केला होता. इस्रायलने हिजबुल्लाहच्या सैनिकांनी वापरलेले पेजर आणि वॉकी-टॉकी यांचा स्फोट केला होता.