पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल लपवून हिजबुल्लाचे कंबरडे मोडणाऱ्या इस्रायलवर हिजबुल्लाने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्त्रायलची आयर्न डोम सिस्टिम सपशेल फेल ठरली असून नागरिकांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला आहे.
इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. इस्रायलवर 100 हून अधिक रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. रविवारी सकाळी जेझरील खोऱ्यात 140 हून अधिक रॉकेट आणि ड्रोन डागण्यात आले. हैफा, नाझरेथ, अफुला, लोअर गॅलीलीसह अन्य भागांमध्येही हल्ला करण्यात आला.
इस्त्रायलची आयर्न डोम यंत्रणा हे हल्ले थोपविण्यास असमर्थ ठरल्याने नागरिकांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला आहे. हिजबुल्लाह दहशतवादी आमच्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत, असे आयडीएफने एक्सवर म्हटले आहे.
रात्रभर रॉकेट अलर्ट सायरन वाजत होते. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही हिजबुल्लाहला जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. इस्रायलने डागलेल्या रॉकेटमध्ये एक रॉकेट शाळेवर पडले. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. धमक्या आम्हाला थांबवणार नाहीत... आम्ही सर्व लष्करी शक्यतांचा सामना करण्यास तयार आहोत, असे हिजबुल्लाहच्या डेप्युटी कमांडरने म्हटले आहे. इस्रायलबरोबरच्या संघर्षाच्या नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे, असे त्याने म्हटले आहे.
बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर शुक्रवारी इस्रायली हल्ल्यात मारल्या गेलेल्या सर्वोच्च कमांडरच्या अंत्यसंस्कारानंतर हिबुल्लाहने हा हल्ला केला आहे. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये सुमारे 130 किलोमीटरची सीमा आहे. हमासमुळे गाझा पट्टी उध्वस्त झाली आहे. आता हिजबुल्लाहमुळे लेबनान हा देश उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. इस्रायलच्या तुलनेत लेबनान कुठेच नाहीय.