इस्रायलवर दात खाऊन असलेली हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना सातत्याने ज्यूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, शनिवारी इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलन हाइट्समधील माजदल शम्स शहरातील फुटबॉल मैदानावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात लहान मुलांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.
टाईम्स ऑफ इस्रायल या वृत्तपत्राने इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हॅगरी यांच्या हवाल्याने रविवारी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. वृत्त पत्राने प्रसिद्ध केलेल्या वृतत्तानुसार, शनिवारी इस्रायली रुग्णवाहिका सेवेकडून देण्यातआलेल्या माहतीनुसार, गोलान हाइट्समध्ये झालेल्या हल्ल्यात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, टाईम्स ऑफ इस्रायलने हॅग्रीचा हवाल्याने दिलेल्या वृत्तात मृतांचा आकडा 11 वर पोहोचल्याचे म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूला, लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने या हल्ल्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नाकारला आहे. मात्र असे असले तरी, इस्रायली अधिकाऱ्यांनी हिजबुल्लाह आणि लेबनॉनविरुद्ध युद्धाची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रायल लवकरच लेबनॉनमध्ये मोठा हल्ला करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, एखाद्याने स्ट्राइक केल्यानंतर इस्रायल प्रत्युत्तरास अधिक वेळ लावत नाही, असे सर्वसाधारणपणे दिसून येते.
मोठी किंमत चुकवावी लागेल -इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात लढाई सुरू झाल्यापासून इस्रायलच्या उत्तर सीमेवरील हा सर्वात घातक हल्ला आहे. यामुळे या प्रदेशात आता व्यापक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. यातच, हिजबुल्लाहला 'या हल्ल्याची अशी किंमत चुकवावी लागेल, जी त्यांनी यापूर्वी कधीही चुकली नसेल,' असा इशार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे.