काबुल – अफगाणिस्तानवरतालिबाननं सत्ता मिळवल्यानंतर आता सरकार बनवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तालिबानी कमांडरने माजी राष्ट्रपती हामिद करजई यांची भेट घेतली. अफगाणिस्तानात यापुढील सरकार शरिया कायद्यानुसार चालेल हे स्पष्ट आहे. अफगाणिस्तान इराणसारखं सरकार चालवण्यात येईल असा दावा रिपोर्टमधून करण्यात येत आहे. हे नवं सरकार कसं असेल याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत.
कोण असेल देशाचा प्रमुख?
CNN रिपोर्टनुसार, तालिबान इराण मॉडेलच्या आधारे अफगाणिस्तानात तालिबान सरकार बनवण्याचा प्लॅन करत आहे. याअंतर्गत अफगाणिस्तान इस्लामिक देश बनवला जाईल ज्याठिकाणी सुप्रीम लीडर देशाचा प्रमुख असेल. तो सर्वात उच्च राजकीय, धार्मिक पदावर असेल आणि तो राष्ट्रपतीपेक्षाही सर्वोच्च असेल. अफगाणिस्तानात हे पद हिबातुल्ला अखुंदजदा याला देण्यात येईल असं सांगितले जात आहे.
एका आठवड्यात होणार निर्णय
अखुंदजदाच्या काऊन्सिलमध्ये ११ ते ७२ लोकांचा समावेश असू शकतो. त्याचे केंद्र कंधारमध्ये असेल. कंधारमध्येच तालिबानची स्थापना झाली होती. कंधार एकेकाळी कट्टरपंथी संघटनेचा गड होता. रिपोर्टनुसार, याचठिकाणी मागील काही दिवस तालिबानी नेते एकत्र येत नव्या सरकारच्या स्थापनेवर चर्चा करत आहेत. एका आठवड्यात सरकार बनवण्याचा निर्णय होऊ शकतो अशी माहिती आहे.
मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...
कोणाकोणाला मिळणार संधी?
सरकारच्या एग्जिक्युटिव्ह ब्रांचचे प्रमुख पंतप्रधान असतील जो अब्दुल गनी बरादर अथवा मुल्ला याकूब असेल. तालिबानचा सहसंस्थापक बरादर यावेळी राजकीय रणनीतीचा हेड असून दोहा येथील टीमचा भाग आहे. तर याकूब मुल्ला हा उमरचा मुलगा आहे जो संघटनेला धार्मिक आणि वैचारिक मुद्दे सांभाळतो. त्याशिवाय अब्दुल हकीम हक्कानीला चीफ जस्टीस बनवलं जाऊ शकतं.
पाकिस्तानचं नजरा अफगाणिस्तानकडे
दुसरीकडे पाकिस्तानच्या नजरा अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारवर लागल्या आहेत. अफगाणिस्तानात पाक समर्थक हक्कानी नेटवर्कला मुख्य पद मिळावं अशी पाकिस्तानची इच्छा आहे. काबुलची सुरक्षा याच दहशतवादी संघटनेच्या हाती देऊन तालिबानने त्याचे संकेत दिले होते की, अखेर ते काम शेजारील राष्ट्राच्या इशाऱ्यावरच सुरु आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात स्थान मिळावं जेणेकरून FATF मध्ये त्याला दिलासा मिळेल असं पाकिस्तानला वाटतं.