लॉरेल : प्लुटोजवळून गेलेल्या न्यू होरायझन यानाने पाठविलेल्या पहिल्या वहिल्या छायाचित्रावरून प्लुटोवर ११ हजार फूट उंचीचे पर्वत आहेत; पण तेथील पृष्ठभागावर खड्डे मात्र नाहीत, यामुळे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. हा ग्रह १० कोटी वर्षे जुना असावा असाही प्राथमिक अंदाज आहे. न्यू होरायझन यानाने ७८०० मैल अंतरावरून प्लुटोची झलक पाहिली आहे. नासाच्या मरीनर यानाने मंगळाची झलक अशीच पाहिली, त्याला आता ५० वर्षे झाली आहेत. काही आठवड्यांपूर्वी प्लुटो हा फक्त बर्फाचा गोळा होता; पण न्यू होरायझन त्याच्या जवळ गेल्यापासून हा बुटका ग्रह अनेक आश्चर्यकारक घटनांचा केंद्रबिंदू झाला आहे. प्लुटोवरचे बर्फाळ ज्वालामुखी, बदलणारे भूखंड आणि इतर वैशिष्ट्यावरून सौरमालेतील ग्रह कसे तयार झाले, जीवनाचा पट कसा विणला गेला याची माहिती मिळणार आहे.११ हजार फुटांचा पर्वत न्यू होरायझन यानाने पाठविलेला पहिला माहितीचा साठा आज पृथ्वीवर पोहोचला. यातील छायाचित्रात प्लुटोच्या भूपृष्ठाचा छोटा भाग दिसला. त्यात ११ हजार फूट उंचीचा पर्वत आहे; पण हा पर्वत गोठलेल्या पाण्याचा वा बर्फाचा असावा असाही अंदाज आहे. प्लुटोवर मिथेन व नायट्रोजन वायंूचा बर्फ होत असावा असा प्राथमिक अंदाज होता; पण या वायूंचा बर्फ पर्वत होण्याइतका टिकत नाही. हा अभ्यास करण्यासाठी जी माहिती पाहिजे ती सध्या होरायझनवर आहे, ती मिळण्यास आणखी एक ते दीड वर्ष लागेल असे होरायझन मोहिमेतील संशोधक जॉन स्पेन्सर यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)प्लुटोच्या पृष्ठभागावर एकही खड्डा नाही हे आणखी एक आश्चर्य आहे. पृष्ठभाग किती जुना आहे हे ठरविण्यासाठी खड्डे लागतात. प्लुटो लांब आहे व छोटा आहे, गरम होण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे या ग्रहावर भूगर्भीय हालचाली होत असाव्यात की नाही, या हालचालीमुळे खड्डे बुजले असावेत काय असे अनेक प्रश्न आज शास्त्रज्ञांसमोर आहेत.
‘प्लुटो’वर उंच पर्वत; पण खड्ड्यांची वानवा
By admin | Published: July 17, 2015 4:35 AM