गोलान हाईट्सवरून सुरु झालेल्या वादाने आता रौद्र रुप घेतले असून इस्रायलने आपला कमांडर मारला याचा बदला हिजबुल्लाहने घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा हिजबुल्लाहने इस्रायलवर अनेक रॉकेट डागली. यापैकी पाच ऱॉकेट इस्त्रायलच्या भूभागावर कोसळली, उर्वरित रॉकेटना आयर्न डोमने हवेतच नष्ट केले.
लेबनानमधून हल्ले होत असल्याचे समजताच सावध असलेल्या इस्रायलने लेबनानमध्ये रॉकेट डागत हिजबुल्लाहचा रॉकेट लाँचरच उध्वस्त केला. गोलान हाईट्समधील एका फुटबॉल मैदानावर हिजबुल्लाहने हल्ला केला होता. त्यात १२ मुलांचा मृत्यू झाला होता. यामुळे इस्रायलने हिजबुल्लाहचा टॉपचा कमांडर फुआदला लेबनानची राजधानी बैरूतमध्ये ठार केले होते. यामुळे तणाव वाढला आहे.
त्याचवेळी इस्रायलने इराणमध्ये सर्वात मोठा शत्रू हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हानियाला ठार केले आहे. यामुळे तिकडे इराणही भडकला असून इस्रायलवर हल्ल्याची तयारी करत आहे. यामुळे इस्रायल हमास हे युद्ध आता इतर देशांत पसरण्याची शक्यता आहे. हानिया हा इराणच्या नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी तिकडे गेला होता. तेव्हाच त्याच्या घरावर मिसाईल डागण्यात आले. यात त्याचा मृत्यू झाला. आता हमास, हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांसोबत इराण देखील युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराणचे सुप्रिम लीडर आयातुल्लाह अली खामेनेईने इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले आहेत. तर इराणच्या या भूमिकेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील आमचा देश लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. वृत्तांनुसार इराण इस्रायलवर पुन्हा एकदा मोठी एअर स्ट्राईक करण्याची शक्यता आहे. १४ एप्रिलला देखील इराणने हल्ला केला होता. यावेळी इस्रायलने संयमाची भूमिका घेतली होती.