वॉशिंग्टन : अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार होण्याच्या स्पर्धेत असणाऱ्या हिलरी क्लिंटन यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. २०१२ साली लिबियामधील बेन्गाझीमधील अमेरिकेच्या कॉन्सुलेटवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांना काँग्रेस समितीच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे. या हल्ल्यामध्ये अमेरिकन राजदूत व तीन अमेरिकन नागरिकांची हत्या झाली होती. या कालावधीमध्ये हिलरी क्लिंटन सेक्रेटरी आॅफ स्टेट पदावर कार्यरत होत्या.बेन्गाझी शहरातील हल्ला यू ट्यूबवरील व्हिडिओ पाहून उत्स्फूर्त प्रतिक्रियेतून करण्यात आला होता असे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले होते. कॉन्सुलेटमधील राजदूत ख्रिस स्टीफन्स यांनी वारंवार केलेल्या संरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते अशा अनेक मुद्यांवर हिलरी यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत त्याचप्रमाणे स्वत:च्या खासगी इमेल सर्वरचा वापर सेक्रेटरी आॅफ स्टेट पदावरती असताना सरकारी कामासाठी केल्याबद्दलही त्यांची चौकशी यामध्ये होईल. हिलरी यांच्या अध्यक्षपदाच्या दावेदारीवर परिणाम होण्यासाठी रिपब्लिकन्सनी मुद्दाम हे प्रयत्न चालविल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाचे म्हणणे आहे. दुसरीकडे हिलरी यांची चौकशी करण्याइतकी सबळ कारणे पुढे करण्याची जबाबदारी रिपब्लिकन पक्षावरही आहे. (वृत्तसंस्था)बेन्गाझी हल्ल्याबद्दल...११ सप्टेंबर २०१२ रोजी लिबियातील बेन्गाझी शहरातील अमेरिकन कॉन्सुलेटच्या इमारतींच्या परिसरावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये राजदूत ख्रिस स्टीफन्स व तीन अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी या परिसरावर असेच सात हल्ले करण्यात आले होते.बिडेन स्पर्धेत नाहीतअमेरिकेचे उपराष्ट्रपती ज्यो बिडेन यांनी २०१६ साली होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपण सहभागी होत नसल्याचे जाहीर केले आहे. ज्यो बिडेन यांच्या मुलाचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी आपल्याकडे फारसा वेळ उरलेला नाही, असे सांगत त्यांनी हा निर्णय स्पष्ट केला. या घोषणेच्या वेळेस ७२ वर्षांच्या ज्यो बिडेन यांच्याबरोबर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामादेखील उपस्थित होते.
बेन्गाझी हल्ला प्रकरणी हिलरी क्लिंटन यांची होणार चौकशी
By admin | Published: October 23, 2015 3:51 AM