टम्पा : अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांची सहानुभुती पाकिस्तानकडे आहे आणि त्यांच्या प्रदीर्घकाळच्या सल्लागार हुमा अबेदिन या जन्माने पाकिस्तानी आहेत, असे रिपब्लिकन हिंदू संघटननेने म्हटले.भारतीय- अमेरिकन दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सध्या ही संघटना क्लिंटन यांच्याविरोधात मोहीम राबवत आहे. २९ सेकंदांच्या या व्यावसायिक जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि पाकव्याप्त काश्मीरचा वादग्रस्त भूभाग आमचा असल्याचे दर्शविणारा पाकिस्तानचा नकाशा आहे. पाकिस्तानबद्दल सहानुभुती असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची मदत दिली व लष्करी उपकरणे दिली. ही मदत आणि उपकरणे भारताविरोधात वापरली गेली. पंतप्रधान मोदी यांना अमेरिका भेटीसाठी व्हिसा मिळू न देण्यास हिलरीच कारणीभूत आहेत. मूलतत्ववादी इस्लामला पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती आणि देशांकडून त्या मदत घेतात, असे या जाहिरातीत म्हटले आहे. या जाहिरातीला रिपब्लिकन हिंदू कोएलिशनने पाठिंबा दिला आहे. (वृत्तसंस्था)>क्लिंटनना मत द्याहिलरी क्लिंटन यांना भारताची आणि त्याच्या संस्कृतीची चांगली जाण असल्यामुळे भारत-अमेरिका यांच्यातील संबंधांना उत्तेजन देण्यासाठी त्या अध्यक्षपदासाठीच्या ‘सर्वोत्कृष्ट’ उमेदवार आहेत, असे मत भारतीय-अमेरिकन हॉटेलचालक संत सिंग चटवाल यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. हिलरी यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या देशाचा कारभार हाकण्याच्या क्षमतेवर चटवाल यांनी शंका व्यक्त केली आहे. अमेरिका व भारत यांच्यातील अणु करार, स्थलांतर यासारख्या महत्वाच्या विषयांवर हिलरी क्लिंटन या परराष्ट्र मंत्री असताना भारताच्या पाठिशी उभ्या राहिल्या, असे चटवाल म्हणाले. चटवाल हे क्लिंटन पती-पत्नीचे प्रदीर्घकाळचे मित्र आहेत.
हिलरी क्लिंटन यांची पाकला सहानुभूती
By admin | Published: November 04, 2016 6:12 AM