वॉशिंग्टन : उत्तरेकडील मोठे चक्रीवादळ येत्या काही दिवसात अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला धडकणार आहे. त्याला ‘हिलरी’ असे नाव देण्यात आले असून, ते सध्या मेक्सिकोच्या दिशेने कूच करत आहे. ‘हिलरी’ हे श्रेणी ४ चक्रीवादळ असून, ते किनाऱ्यावर आदळल्यानंतर अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ॲरिझोना व नेवाडा या राज्यांत एका दिवसात वर्षभराएवढा पाऊस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्नियात पुढील दोन दिवसात १० इंच पावसाचा इशारा आहे. मेक्सिको व कॅलिफोर्नियात पूर येण्याची शक्यता आहे. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननुसार हे वादळ आधी मेक्सिकोला धडकेल आणि नंतर कॅलिफोर्नियाच्या दिशेने सरकणार आहे.
सोमवारपर्यंत शाळा राहणार बंद
हे चक्रीवादळ लवकरच कॅबो सॅन लुकास या रिसॉर्ट शहरावर धडकून कमकुवत होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोतील काही शहरांनी सोमवारपर्यंत अनावश्यक सार्वजनिक कार्यक्रम व शाळा बंद ठेवल्या आहेत. तिजुआनाच्या अतिजोखीम भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी हिलरी वादळ मेक्सिकोपासून सुमारे ३५० मैल दूर होते. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांसाठी ८० निवारे उभारण्यात आले असून, त्यात ९ हजार लोकांना राहता येईल.