India Pakistan Talks, Hina Rabbani Khar: इस्लामाबाद आणि नवी दिल्ली (भारत आणि पाकिस्तान) यांच्यात पडद्यामागे कोणतीही 'बॅक-चॅनल' चर्चा होत नसल्याचे पाकिस्तानने सांगितले. पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी संसदेच्या वरच्या सभागृहातील सिनेटला सांगितले की, सध्या भारताशी अशी कोणताही चर्चा सुरू नाही. अनौपचारिक मुत्सद्देगिरीने काही परिणाम मिळाले असते तर ते योग्य ठरले असते, असेही त्या म्हणाल्या. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी त्यांच्या साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्येही भारतासोबत अनौपचारिक राजकीय चर्चा न करण्याबाबत खार यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये नक्की काय आहे राजकीय परिस्थिती?
"भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही अनौपचारिक मुत्सद्दीगिरी किंवा चर्चा सुरू नाही. खार यांनी सिनेटला सांगितले की, पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, परंतु सध्या, सीमापार शत्रुत्व (भारताकडून) ही एक मोठी समस्या आहे. त्याचा वेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल. एकेकाळी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतासोबतचे संबंध सामान्य करण्यास सांगितले गेले होते, परंतु आता नवी दिल्ली इस्लामाबादला काय संदेश देत आहे याकडे जगाने लक्ष दिले पाहिजे," मुमताज झहरा बलोच म्हणाल्या.
भारत, पंतप्रधान मोदींवर बरसल्या हिना रब्बानी
"आम्हाला जे संदेश आणि निरोप मिळत आहेत ते सर्व प्रक्षोभक स्वरूपाचे आहेत. प्रदेशातील शक्य त्या गोष्टींचा लाभ साऱ्यांना घेता यावा अशा प्रकारची आमची विचारसरणी आहे. तुमचा प्रदेश उपयोगात आणण्यात पाकिस्तानला सर्वात जास्त रस आहे. परंतु जेव्हा आपल्याकडे दुसऱ्या बाजूचे सरकार अशा प्रकराचे असते, ज्यांचे पंतप्रधान म्हणतात की त्यांची अण्वस्त्रे दिवाळीसाठी नाहीत… अशा वेळी आपण काय करू शकतो?" असे हिना रब्बानी खार खासदारांना उद्देशून म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाबद्दल बोलताना खार म्हणाल्या, "पाकिस्तानने आधीच जे सांगितले आहे ते त्यांनी जगाला दाखवले आहे. पाकिस्तानने इतिहासातून धडा घेतला आहे, मात्र या भागातील काही देशांनी शिकलेले नाही."
दरम्यान, मे महिन्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परराष्ट्र मंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींच्या गोव्यात बैठक होणार होती. त्या बैठकीला परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांना उपस्थित राहण्यास मनाई केल्याचे वृत्त भारतीय माध्यमांनी दिले. त्यानंतर काही दिवसांतच हिना रब्बानी खार यांची ही टिप्पणी आली आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांना आमंत्रित केले.
एससीओ बैठकीचे यजमान म्हणून भारताने पाठवलेले निमंत्रण पाकिस्तानला मिळाले असून त्याचा आढावा घेत असल्याचे बलोच म्हणाल्या. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. भारतीय आमंत्रणावर मानक प्रक्रियेनुसार पावले उचलली जात आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. SCO ही एक महत्त्वाची आंतर-प्रादेशिक संघटना आहे, ज्याचा उद्देश सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक संबंध आणि विविध क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे आहे, हे बलोच यांनी अधोरेखित केले.