इस्लामाबाद - अनेक राजकीय उलथापालथींनंतर पाकिस्तानमधील इम्रान खान यांचे सरकार जाऊन शाहबाज शरीफ यांचं सरकार सत्तेमध्ये आलं आहे. या सरकारच्या कॅबिनेटचा आज शपथविधी होणार आहे. यामध्ये सिनेटचे चेअरमन सादिक संजरानी आज शपथ घेणार आहेत. त्याशिवाय ३४ मंत्रीही शपथ घेणार आहेत. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यावर आपल्या सौंदर्यामुळे जगभरातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानी राजकारणातील महिला नेत्या हिना रब्बानी खार यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शाहबाज शरीफ यांच्या कॅबिनेटमध्ये रियाज पिरजादा, मुर्तझा जावेद अब्बासी, आझम नजीर तरार, खुर्शिद शाह, नवीम कमर, शेरी रहमान यांचा शपथविधी होऊ शकतो. तसेच कादिर पटेल, शाजिया मुर्री, मुर्तझा महमूद, साजिद हुसेन यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश होऊ शकतो. तसेच पीपीपीच्या हिना रब्बानी खार, मुस्तफा नवाज खोखर यांचीही मंत्रिपदी वर्णी लागू शकते.
हिना रब्बानी खार यांनी याआधीही पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले होते. तेव्हा त्यांनी परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या राजकीय निर्णय कौशल्याबरोबरच त्यांच्या सौंदर्यामुळे त्या पाकिस्तानसह जगभरात चर्चैचा आणि आकर्षणाचा विषय ठरल्या होत्या.