Hindenberg Research: गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाविरोधात रिपोर्ट जारी करुन मोठी प्रसिद्धी मिळवणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) आता एक नवीन रिपोर्ट जारी केली आहे. आपल्या ताज्या रिपोर्टमध्ये कंपनीने अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीस्थित Ai कंपनी सुपर मायक्रो कॉम्प्युटर (Super Micro Computer Inc) वर गंभीर आरोप केले आहेत. ही रिपोर्ट आल्यानंतर कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात म्हटले की, "आम्ही तीन महिन्यांपासून कंपनीची तपासणी करत होतो. यासाठी आम्ही कंपनीचे माजी कर्मचारी आणि तज्ञांच्या मुलाखती घेतल्या, कायदेशीर प्रकरणे आणि रेकॉर्ड्सही तपासले. आमच्या तपासाअंती कंपनीने आपल्या अकाउंट्समध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे." हिंडनबर्गच्या माहितीनुसार, 2018 मध्ये सुपर मायक्रो कॉम्प्युटरला आर्थिक तपशील न भरल्यामुळे डीलिस्ट करण्यात आले होते. तसेच, 2020 मध्ये यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला $200 मिलियनची आर्थिक अनियमितता आढळली होती.
हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले की, आमच्या तपासात अशी माहिती समोर आली आहे की, कंपनीने आपल्या अकांउंटींगच्या कामासाठी पुन्हा त्याच लोकांची नियुक्ती केली, जे यापूर्वी या घोटाळ्यात सामील होते. कंपनीच्या माजी सीएफओवर तर अकाउंटिंग उल्लंघनाचाही आरोप होता. याशिवाय, हिंडनबर्ग रिसर्चने सांगितले की, 2006 सुपर मायक्रोने इराणमध्ये प्रतिबंधित कॉम्पोनंट्स निर्यात करण्याची चूक मान्य केली होती. तसेच, कंपनीने रशियालाही काही हाय टेक प्रोडक्ट्स निर्यात केले आहेत. हे अमेरिकेच्या निर्यात बंदीचे उल्लंघन आहे. विशेष म्हणजे, दिग्गज चिप निर्माती Nvidia सुपर माययक्रोची भागीदार असून, कंपनीला चिप्स पुरवण्याचे काम करते.