ऑनलाइन लोकमत
शांघाय, दि. 18 - आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या भारतीय नाट्यसृष्टीसाठी 22 एप्रिल हा दिवस ऐतिहासीक ठरला. कारण चीनच्या शांघाय येथे महान कवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश( 1925-1972) यांच्या "आषाढ़ का एक दिन" या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर करण्यात आला. आधुनिक शांघायच्या इतिहासात एखाद्या हिंदी नाटकाचा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ होती.
शांघायसारख्या व्यस्त शहरात "आषाढ़ का एक दिन" या नाटकाच्या यशस्वी प्रयोगामुळे अनेक वर्षांपासून आपली माती, आपल्या भाषेपासून दूर राहूनही हिंदी रंगभूमीवर प्रेम करणा-यांची संख्या कमी झाली नसल्याचं दाखवून दिलं. शांघायमधल्या यशानंतर आता बिजिंग आणि ग्वॉगजौ या शहरांतूनही नाटकाचं आयोजन करण्याचा आग्रह धरला जात आहे.
हिंदी भाषा माहीत नसलेले दर्शक ज्यांनी कधीच रंगभूमीसाठी काम केलेलं नाही अशा कलाकारांसह काम करण्याचा निर्णय आव्हानात्मक होता असं नाटकाचे दिग्दर्शक आणि कालिदासाची भूमिका करणारे मुकेश शर्मा म्हणाले. नाटकाची तयारी करण्यासाठीही वेळ मिळत नव्हता कारण टीममधील अनेक सदस्य वेगवेगळ्या खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यामुळे स्काइपवर नाटकाची तयारी करावी लागत असे. पण कलाकारांनी 5 महिने घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे नाटक यशस्वी ठरलं असं ते म्हणाले.
महान कवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित या नाटकात कालिदास यांची प्रेयसी मल्लिका हिच्या भूमिकेत प्रियंका जोशी, मातुलच्या भूमिकेत अमित वायकर कालिदासांचा स्वयंघोषीत मित्र आर्य विलोम याच्या भूमिकेत अमित मेघणे, मल्लिकाची आई अंबिका हिच्या भूमिकेत धनश्री आणि राज वधूच्या भूमिकेत अपर्णा वायकर आदींनी आपल्या अफलातून अदाकारीने केवळ प्रेक्षकांना 2 तास थांबवून ठेवलं नाही तर त्यांना मंत्रमुग्ध केलं.
विशेष म्हणजे स्त्रीप्रधान असलेल्या या नाटकाची सर्व जबाबदारी ही महिलांच्याच खांद्यावर होती. बीना वाघेला यांचा यामध्ये मोठा वाटा होता. हिंदी समजत नसलेल्या दर्शकांना नाट्यगृहापर्यंत आणण्याचं काम हे आव्हानात्मक होतं पण सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झालं असं त्या म्हणाल्या.
यावेळी शांघायमधील भारताचे कॉन्सल जनरल प्रकाश गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनेक वर्षांपूर्वी हे काव्य वाचलं होतं पण शांघायमध्ये प्रत्यक्ष हे नाटक पाहून खरंच खूप आनंद झाला असं म्हणत त्यांनी सर्व कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतूक केलं.
शांघाय रंगमंचाचे अकादमीचे उपाध्यक्ष "यूउ" यांची उपस्थितीही यावेळी लक्षणीय होती. त्यांनीही कलाकारांचं कौतूक केलं तसंच भविष्यात चीनी भाषेत हिंदी नाटकं व्हायला हवीत अशी इच्छा व्यक्त केली.
आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या हिंदी रंगभूमीसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.