इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका मशिदीतून पाणी घेतल्याने एक गरिब हिंदू शेतकरी कुटुंबाला छळाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही कट्टरतावाद्यांनी धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याचे म्हणत हिंदू कुटुंबाचा खूप छळ केला आहे. या प्रकरणातील आरोपी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानमधील 'डॉन'ने दिलेल्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील रहीमयार खान शहरात राहणाऱ्या आलम राम भील हे पत्नी व कुटुंबातील इतर सदस्यांसह शेतात काम करत होते. भील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी जवळील एका मशिदीजवळ गेले होते. त्यावेळी काही स्थानिक जमीनदारांनी हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतरही शेतातून काम संपवून भील कुटुंबीय पुन्हा घरी परतत असताना त्यांना ओलीस ठेवण्यात आले.
मशिदीचे पावित्र्य भंग केल्याच्या आरोपाखाली हिंदू कुटुंबाचा छळ
मशिदीचे पावित्र्य भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांचा खूप छळ करण्यात आला. पोलिसांना यांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली नाही. आरोपी हे सत्ताधारी तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे स्थानिक खासदारांशी संबंधित आहेत. भील यांनी पोलिसांच्या या निष्क्रियतेचा विरोध करण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. इम्रान खान यांच्या पक्षाचे आमदार जावेद वारियाच यांनी तक्रार दाखल करण्यास मदत केली असल्याचे स्थानिक जिल्हा शांतता समितीचे सदस्य पीटर भील यांनी सांगितले.
ज्येष्ठ वकील आणि जिल्हा बार काउंसिलचे माजी अध्यक्ष फारूख रिंद यांनी सांगितले की, येथील वस्ती कहूर भागाशी संबंधित आहेत. या ठिकाणी भील एक दशकाहून अधिक काळापासून वास्तव्य करत आहे. त्यांनी म्हटले की, या ठिकाणचे हिंदू समुदायातील बहुतांशी सदस्य हे शेतात काम करणारे गरिब आहेत. आरोपी जमीनदार लहान-मुद्यांवर अन्य ग्रामीण नागरिकांना मारहाण करण्यासाठी कुख्यात आहेत. रिंद यांनी पीडित कुटुंबाला मोफत कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.