ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 19 - पाकिस्तानमधील हिंदू हे बाहेरचे आहेत, मुस्लीम धर्म, संस्कृती व समाजव्यवस्था इतकी वेगळी आहे की हिंदूंबरोबर सहचर्यानं राहणं अशक्य आहे, अशाप्रकारची गरळ पाकिस्तानमधल्या शालेय पुस्तकांमध्ये ओकण्यात आल्याचं समोर आले आहे. युएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रीलिजिअस फ्रीडम या संस्थेने या अभ्यास केला आहे. पाकिस्तानमधली पुढची पिढी असं शिक्षण घेतल्यानंतर हिंदू बहुसंख्य असलेल्या भारताबरोबर शांततेनं राहूच शकत नाही असा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे.
पाकिस्तानमधल्या 4.1 कोटी विद्यार्थ्यांच्या मनावर भारत व हिंदूविरोधी संस्कार पद्धतशीरपणे करण्यात येत असून पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांबाबत चुकीची माहिती प्रसृत केली जात असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
केवळ भारतातल्या हिंदूंबाबतच नाही तर पाकिस्तानातल्या हिंदूंनाही बाहेरचे ठरवणारे हे शिक्षण असल्यामुळे पुढच्या पिढ्या हिंदूंसोबत शांततेनं जगूच शकणार नाहीत अशी भीती व्यक्त होत आहे.
पाकिस्तानची ओळख मुस्लीम देश अशी करून देताना पाकिस्तानचं भारताशी शत्रुत्व धर्मावरून असल्याचं मुलांच्या मनावर बिंबवलं जात आहे.
भारतामधल्या हिंदू संघटना मुस्लीमांचं शिरकाण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात येत आहे. बाबरी मशिदीचं पतन आणि गुजरातमधल्या दंगलींचा यासाठी शालेय शिक्षणामध्ये दाखला देण्यात येत आहे.
पाकिस्तानमधल्या विद्यार्थ्यांना सर्व धर्मांबाबत आदराची भावना शिकवण्याची गरज असल्याचे मत या संस्थेने व्यक्त केले असून, अन्यथा येत्या काळामध्ये भारताबरोबर शांतीपूर्ण संबंध राहणे शक्य नसल्याची भीती व्यक्त केली आहे.