जकार्ता - इंडोनेशियामधील आयलँड बाली येथील अगुंग पर्वतावर ज्वालामुखी फुटण्याची शक्यता आहे. ज्वालामुखी शांत करण्यासाठी येथील हिंदूनी पूजा अर्चना सुरु केली आहे. गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच हा ज्वालामुखी फुटणार आहे. ऑगस्ट महिन्यापासूनच पर्वताच्या आजुबाजूला हादरे जाणवत आहेत. ज्वालामुखी फुटेल या भीतीने आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी घर सोडून दुस-या ठिकाणी बस्तान हलवलं आहे. मात्र अनेकजण अद्यापही ज्वालामुखी शांत होऊन परिस्थिती पुर्वपदावर येईल असा विश्वास असल्याने तेथेच थांबले आहेत.
ज्याप्रकारे पर्वतामधून हादरे जाणवत आहेत ते पाहता ज्वालामुखी लवकरच फुटेल असं लोकांना वाटत आहे. एका स्थानिक हिंदू व्यक्तीने सांगितल्यानुसार, लोक ज्वालामुखीची पूजा करत आहेत. अंगुग पर्वत लवकरच शांत होईल असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे. आता देवच आपल्याला या परिस्थितीमधून वाचवेल अशी आशा येथील लोकांना आहे.
अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १७०० लोक मृत्युमुखी पडले होते.
अगुंग पर्वत त्याच्या उंचीमुळे पश्चिमेकडील समुद्रावरून आलेले ढग पूर्णपणे रोखून धरतो. त्यामुळे पुरा बेसाकी असलेला त्याचा दक्षिणपश्चिम उतार वर्षभर ढगांनी वेढलेला, थंड आणि हिरवागार असतो, तर त्याचा उत्तरेकडील उतार बाष्पाअभावी कोरडा आणि रखरखीत असतो.