Sp Hinduja Death: हिंदुजा ग्रुपचे चेअरमन आणि चार भावांपैकी सर्वात मोठे असलेले श्रीचंद परमानंद हिंदुजा (SP Hinduja) यांचे आज, बुधवारी वयाच्या ८७व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज लंडनमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदुजा ग्रुपचे प्रवक्ते यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 'गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला आज आमच्या कुटुंबाचे प्रमुख आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्री एसपी हिंदुजा यांचे निधन झाल्याची घोषणा करताना अत्यंत दु:ख होत आहे. ते ब्रिटिश नागरिक होते. त्यांचे लंडनमध्ये निधन झाले,” असे कुटुंबाचे प्रवक्ते म्हणाले.
हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ बंधू असलेले एसपी हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन झाले. हिंदुजा कुटुंबात एसपी हिंदुजा यांच्या व्यतिरिक्त गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हे तीन भाऊ आहेत. एसपी हिंदुजा यांच्या निधनाची माहिती देताना कुटुंबाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांच्यासह संपूर्ण हिंदुजा कुटुंब अत्यंत दुःखाने कळवत आहे की, कुटुंबाचे प्रमुख आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन झाले आहे.
एसपी हिंदुजा वयाच्या १८ व्या वर्षापासून व्यापारउद्योगात सक्रिय
श्रीचंद हिंदुजा यांना एसपी म्हणूनही ओळखले जात होते. हिंदुजा ग्रुपचे संस्थापक पीडी हिंदुजा यांचे ते ज्येष्ठ पुत्र. हिंदुजा ग्रुप आणि चॅरिटेबल फाऊंडेशनचे ते अध्यक्ष होते. १९५२ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी एसपी आपल्या वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले. भारतीय वंशाच्या हिंदुजा यांनी नंतर ब्रिटिश नागरिकत्व घेतले आणि ते लंडनमध्ये राहिले. श्रीचंद पी हिंदुजा यांचे मधू यांच्याशी लग्न झाले असून त्यांना सानू आणि वीणू या दोन मुली आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अशोक लेलँड आणि बँकिंग क्षेत्रातील इंडसइंड बँक यांसारख्या कंपन्यांमध्ये हिंदुजा समूहाचा मोठा हिस्सा आहे. इंडसइंड बँकेचे प्रमोटर हिंदुजा समूह आहे.