लंडन : हिंदुजा ग्रुपने ऐतिहासिक १,१०० खोल्यांची ओल्ड वॉर आॅफिस इमारत अखेर खरेदी केली आहे. या इमारतीतून ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी युद्ध काळात काम बघितले होते. आता या इमारतीचे रूपांतर पंचतारांकित हॉटेलमध्ये केले जाईल.या इमारतीचा पत्ता ५७, व्हाईट हॉल असा असून ती ब्रिटिश संसदेच्या व पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आहे. पाच लाख ८० हजार चौरस फूट क्षेत्र व्यापलेल्या या इमारतीला सात मजले असून तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतराने ते जोडले गेलेले आहेत.या इमारतीचा ताबा देण्याघेण्याचा औपचारिक समारंभ मंगळवारी येथे झाला. हिंदुजा ग्रुपचे सह अध्यक्ष जी. पी. हिंदुजा, त्यांचे बंधू व युरोपमधील हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष पी. पी. हिंदुजा व त्यांचे स्पॅनिश भागीदार व विल्लार-मीर आणि ओएचएल ग्रुपचे अध्यक्ष जुआन- मिग्युएल विल्लार-मीर उपस्थित होते. ही इमारत किती रकमेत खरेदी करण्यात आली हे सांगण्यात आलेले नाही. या इमारतीत खासगी कार्यक्रमासाठी खोल्या, स्पा आणि फिटनेस सोयीसुविधा असतील. २५० वर्षांच्या मुदतीसाठी ही इमारत स्पर्धात्मक मार्केटिंग प्रक्रियेद्वारे विकण्यात आली, असे इंग्लंडच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
लंडनमधील ओल्ड वॉर आॅफिस हिंदुजांनी घेतले
By admin | Published: March 03, 2016 3:40 AM