लाहोर - पाकिस्तानमध्ये अजून एका ऐतिहासिक वास्तूची मोडतोड झाली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात असलेल्या अनेक शतके जुन्या गुरू नानक महालाचा एक मोठा भाग स्थानिक व्यक्तींनी अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने तोडला. तसेच या महालाती मौल्यवान सामान विकून टाकल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार गुरू नानक महाल या चार मजली इमारतीमध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्यासह हिंदू राज्यकर्ते आणि राजकुमारांच्या तसबिरी होत्या. दरम्यान, तेथील अधिकाऱ्यांना या महालाच्या मालकाबाबत काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. स्थानिक लोक या इमारतीला बाबा गुरू नानक महाल असे संबोधतात. भारतासह अनेक देशातील शीख येथे येत असत, असे स्थानिक नागरिक मोहम्मद अस्लम याने सांगितले. काही बड्या स्थानिक व्यक्तींकडून या वास्तूची तोडफोड सुरू आहे. मात्र कुठल्याही अधिकाऱ्याने काहीही कारवाई केलेली नाही. तसेच कुणीही येथे आलेला नाही. या भागातील बड्या लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने या वास्तूला उद्ध्वस्त केले. तसेच त्यातील मौल्यवान खि़डक्या दरवाजे, तावदाने आणि लाकडे विकून टाकली असे स्थानिक मोहम्मद अश्रफ यांनी सांगितले.
पाकिस्तानमधील ऐतिहासिक गुरु नानक महालाची मोडतोड, मौल्यवान सामान चोरले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 4:06 PM